पुढील दोन ते तीन दिवस राज्यात वेगवान वाऱ्यांच्या साथीने जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
भुवनेश्वर, 26 सप्टेंबर: बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेलं गुलाब चक्रीवादळ (Cyclone Gulab) आज मध्य रात्रीपर्यंत आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीला धडकणार आहे. ताशी 85 ते 95 किमी प्रतितास वेगानं हे वादळ किनारपट्टीच्या दिशेनं मार्गक्रमण करत असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही तासांत आध्र प्रदेश आणि ओडिशा राज्यातील किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने याठिकाणी रेड अलर्ट जारी केला आहे. बंगालच्या उपसागरात मागील काही दिवसांपासून हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र कार्यरत होतं. शनिवारी दुपारी हे क्षेत्र अधिक तीव्र झाल्यानंतर याठिकाणी चक्रीवादळ निर्माण झालं आहे. रविवारी मध्यरात्रीपर्यंत हे वादळ आंध्र प्रदेशच्या उत्तर किनारपट्टीला आणि ओडिशाच्या दक्षिण किनारपट्टीला धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा परिणाम म्हणून पुढील तीन ते चार दिवस महाराष्ट्रात वेगवान वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे चक्रीवादळ आज सायंकाळपर्यंत कलिंगपट्नम आणि गोपालपूरम याठिकाणी धडकण्याची शक्यता IMD ने वर्तवली आहे. हेही वाचा- Coronavirus : धोका वाढला! वैज्ञानिकांना आढळला कोरोनाचा आणखी एक व्हेरिएंट सध्या हे चक्रीवादळ गोपालपूरच्या पूर्व-दक्षिण दिशेला 270 किलोमीटर अंतरावर आहे. तर कलिंगपट्नम पासून याचं अंतर 330 किमी दूर आहे. सध्या या वादळात वाऱ्याचा वेग 75 ते 85 किमी प्रतितास इतका असून पुढील काही तासांत वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. जवळपास 95 किमी प्रतितास वेगाने हे चक्रीवादळ किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याने किनारपट्टीवर राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. हेही वाचा- कोरोना लसीकरणाचा दुसरा डोज घ्यायचा विसरलात तरी घाबरू नका, हे उपाय करा भारतीय हवामान खात्याने संबंधित ठिकाणांना रेड अलर्ट जारी केला असून अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे याठिकाणी जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून विदर्भ, तेलंगणा, मराठवाडा कोकण, मुंबई आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी 29 सप्टेंबरपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच मच्छिमारांनी बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात न जाण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.