नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर : सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झालेली असली, तरी सणासुदीनंतर पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या अचानक वाढू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दिवाळीच्या तोंडावर (Diwali) अनेक राज्यांमधले नागरिक निष्काळजीपणे वर्तणूक करत असल्याचं दिसत आहेत. बाजारात अनेक जण मास्क न लावता आणि सोशल डिस्टन्सिंगचं (Social Distancing) पालन न करता गर्दी करत आहेत. याशिवाय देशातल्या अनेक राज्यांमध्ये AY.4.2 हा कोरोनाच्या (Corona) डेल्टा वेरिएंटचा (Delta Variant) नवा प्रकार समोर येत असून, देशातील तिसऱ्या लाटेस (Third Wave) हा प्रकार कारणीभूत ठरू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे, मात्र कोरोनाच्या AY.4.2 या वेरिएंटविषयी फारशी माहिती उपलब्ध नसल्याचं तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे. AY.4.2 वेरिएंट काय आहे? AY.4.2 हा कोरोनाच्या डेल्टा किंवा B.1.617.2 या प्रजातीचं म्युटेशन (Mutation) असून, तो मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात आढळून आला होता. हा डेल्टा वेरिएंटपासून तयार झाला आहे. मात्र तो AY.4 पेक्षा भिन्न आहे. डेल्टा वेरिएंटचे 55 सबवेरिएंट (Sub Variant) आहेत. अहवालानुसार, हा वेरिएंट सर्वप्रथम ब्रिटनमध्ये (Britain) जुलै महिन्यात आढळून आला. मात्र सध्या या वेरिएंटशी निगडित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. या सबवेरिएंटच्या स्पाइक प्रोटीनमध्ये A222V आणि Y145H अशी दोन मोठी म्युटेशन्स आढळून आल्याचं बोललं जात आहे. AY.4.2 हा वेरिएंट जास्त संसर्गजन्य असल्याबाबत तज्ज्ञांचं एकमत झालं आहे. परंतु, चिंता करण्यासाठी एकही बाब अद्याप आढळलेली नाही. रशियातल्या संशोधकांनी रॉयटर्सशी बोलताना सांगितलं, की `AY.4.2 हा त्याचा मूळ वेरिएंट म्हणजेच डेल्टा वेरिएंटच्या तुलनेत 10 पटींनी अधिक संसर्गजन्य असू शकतो. मात्र त्याची प्रक्रिया संथ असू शकते आणि लस या वेरिएंटवर गुणकारी आहे.` जागतिक आरोग्य संघटना काय सांगते? जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) म्हणण्यानुसार, जगभरात AY.4.2 बाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. `डीएनए` या न्यूज वेबसाइटच्या वृत्तानुसार, जगभरात AY.4.2 या वेरिएंटने बाधित असलेल्या एकूण रुग्णांची संख्या 26,000 असल्याचं नुकतंच जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे. यावरून हा वेरिएंट डेल्टा वेरिएंटच्या तुलनेत 15 पट संसर्गजन्य असल्याचं स्पष्ट होतं. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेडरॉस एडोहेनोम गेब्रेयसस यांनी नुकतंच स्पष्ट केलं, की दोन महिन्यांनंतर पुन्हा एकदा कोरोनाबाधित आणि मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. युरोपमध्ये (Europe) ही संख्या अधिक आहे. यावरून ही महामारी (Pandemic) अद्याप संपुष्टात आलेली नसून, विषाणू (Virus) अजूनही म्युटेट होत असल्याचं दिसून येत आहे. जोपर्यंत या विषाणूवर नियंत्रण मिळवता येत नाही, तोपर्यंत संसर्ग कायम राहणार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.
भारतात चिंतेचं कारण - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान एप्रिल ते मे महिन्याच्या कालावधीत भारताला भयानक परिस्थितीचा सामना करावा लागला. या कालावधीत बाधित रुग्ण संख्या आणि मृत्यूच्या आकडेवारीनं नवा उच्चांक गाठला होता. या दरम्यान देशातली आरोग्यव्यवस्था अडचणीत आली. या कालावधीत ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवला. आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षणीय कमी झाली आहे. दिवाळीनंतर रुग्णसंख्या वाढण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिल्यानं सणासुदीच्या काळात नागरिकांनी मास्क वापरावा आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं, असं आवाहन केंद्र आणि राज्य सरकार वारंवार करत आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी लसीकरण प्रतिबंध करू शकत नाही, तर केवळ त्याची तीव्रता कमी करते, असा इशारा दिला आहे. या स्थितीचा सामना करण्यासाठी कोणती पावलं उचलली जात आहेत? सणासुदीच्या काही आठवड्यांपूर्वी केंद्रानं राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना अत्यंत सावधगिरी बाळगण्यास सांगितलं होतं. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं होतं, की कोणत्याही विपरीत परिस्थितीचा सामना करण्यासाठी SOP जारी करण्यात आली होती. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचं प्रमाण 5 टक्क्यांपेक्षा जास्त असलेले कंटेन्मेंट झोन आणि जिल्ह्यांमध्ये गर्दी वाढू नये यासाठी कोणत्याही प्रकारच्या मेळाव्यास परवानगी देऊ नये.
केंद्रीय आरोग्य मंत्रालय, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांच्या उपस्थितीत उद्या (3 नोव्हेंबर) एक बैठक आयोजित करण्यात येणार आहे. यात लसीकरणाचा वेग कमी असलेल्या 11 राज्यांमध्ये तो वेग वाढवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येईल. ही बैठक 12 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होईल. या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी, 11 राज्यांचे मुख्यमंत्री, 40 जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित राहतील. यात ज्या राज्यांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या डोसच्या संख्येची सरासरी राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे, अशा बिहार, झारखंड, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, नागालँड, पंजाब, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे.