JOIN US
मराठी बातम्या / देश / congress president election result : आज मिळणार काँग्रेसला नवा अध्यक्ष, थोड्याच वेळात मतमोजणी

congress president election result : आज मिळणार काँग्रेसला नवा अध्यक्ष, थोड्याच वेळात मतमोजणी

24 वर्षानंतर काँग्रेसला गांधी कुटुंबाबाहेरचा अध्यक्ष मिळणार आहे. त्यामुळे अध्यक्षपदी कुणाची निवड होणार?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 ऑक्टोबर : काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर हे दोघे अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. 24 वर्षानंतर काँग्रेसला गांधी कुटुंबाबाहेरचा अध्यक्ष मिळणार आहे. त्यामुळे अध्यक्षपदी कुणाची निवड होणार आहे, हे पाहण्याचे ठरणार आहे. काँग्रेसच्या 137 वर्षाच्या इतिहासात सहाव्यांदा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. या दोन्ही उमेदवारांचे आणि काँग्रेस पक्षाचे भवितव्य सोमवारी मतपेट्यांमध्ये बंद झाले होते. अध्यक्षपद निवडणुकीसाठी जवळपास 96 टक्के मतदान झालंय. 24 अकबर रोड येथील काँग्रेस मुख्यालयात सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीला सुरूवात होईल. (मल्लिकार्जुन खर्गे vs शशी थरूर : कोणता नेता अध्यक्ष झाल्यास काँग्रेसचं नशीब पालटणार?) दरम्यान, काँग्रेस पक्षनेते २०१९ पासून ज्याची वाट पाहात आहेत, ते अध्यक्ष पक्षाला मिळणार आहेत. इथपर्यंत येण्याचा प्रवास साहजिकच खूप क्लिष्ट राहिला असल्याचं बोललं जातं. राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये काँग्रेसचं अध्यक्षपद सोडलं. त्यानंतर सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष म्हणून काम बघत होत्या मात्र पक्षाची देशभरातील एकंदरीत स्थिती बघता पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी अध्यक्ष असणं गरजेचं असल्याचं वेळोवेळी दिसून आलं. अध्यक्षांची मागणी होताना अध्यक्ष गांधी घराण्यातीलच व्हावा अशी अनेकांची इच्छा होती, मात्र राहुल गांधींचा अध्यक्षपद स्वीकारण्यासाठीचा नकार, सोनिया गांधी यांची खालावलेली तब्येत आणि प्रियांका गांधी वड्रा यांच्या हाती फारसं यश न लागणं यासर्व गोष्टींमुळे ‘नॉन-गांधी’ हाच एक पर्याय पक्षाकडे राहिला. अध्यक्षपदाच्या रेसमध्ये इतर उमेदवारांना डावलून शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खर्गे इथपर्यंत कसे पोहोचले? नॉन-गांधी नावाच्या चर्चा सुरु झाल्या तेव्हा अनेक नेत्यांची नावं समोर आली. अशोक गेहलोत, के. सी. वेणुगोपाल, मुकुल वासनिक, मल्लिकार्जुन खर्गे, कुमारी शैलजा अशी नावं समोर येत असताना अचानक शशी थरूर यांनी आपण निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं. ते गांधी घरण्याचे उमेदवार नसल्याने त्यांना सोनिया गांधींची परवानगीची घ्यावी लागली. सोनिया गांधींनी निवडणूक लढवण्याची परवानगी दिली मात्र शशी थरूर यांच्या विरुद्ध उमेदवार गांधी उभा करणार हे देखील फिक्स झालं. कारण नॉन-गांधी उमेदवार उभा करतानाच असा उमेदवार गांधी उभा करतील ज्याची पकड गांधींकडे असेल, असं राजकीय विश्लेषक सांगत आले आहेत. मात्र शशी थरूर निवडणुकीच्या रिंगणात उतरणं हे त्याच्या अगदी विरुद्ध होतं. म्हणूनच अखेर मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावावर शिकामोर्तब करण्यात आला. मल्लिकार्जुन खर्गे यांचं स्वतंत्र बळ किती ? ते अध्यक्ष होण्याचा पक्षाला काय फायदा? शशी थरूर यांच्या विरुद्ध मल्लिकार्जुन खर्गे यांचं नाव फिक्स होण्यामागे पाहिलं कारण साहजिकच त्यांची गांधी कुटुंबाशी असलेली एकनिष्ठता आहे. मल्लिकार्जुन खर्गे १९७२ पासून काँग्रेमध्येच आहेत. खर्गे गांधी यांचे विश्वासू असल्याचं उदाहरण म्हणजे यावर्षी पार पडलेल्या राज्यसभेच्या निवडणुकांच्या वेळी महाराष्ट्रासाठी काँग्रेसचे निरीक्षक म्हणून खर्गे यांची नियुक्ती करण्यात आली होती. दुसरं म्हणजे ५ राज्यांच्या निवडणुकीत जेव्हा काँग्रेसचा पराभव झाला तेव्हा खर्गे यांनी सोनिया गांधींची बाजू मांडत “पराभवासाठी प्रत्येक राज्यातील नेता आणि खासदार जबाबदार आहेत, गांधी कुटुंब नाही” असं वक्तव्य केलं होतं. तर दुसरं कारण म्हणजे त्यांचं पक्षातील बळ.

खर्गे कर्नाटकातून राज्यसभेचे विद्यमान सदस्य आहेत आणि १६ फेब्रुवारी २०२१ पासून राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. २०१४-२०१९ दरम्यान लोकसभेतील काँग्रेस पक्षाचे नेते होते. माजी रेल्वेमंत्री आणि कामगार आणि रोजगार मंत्री म्हणूनही त्यांची कारकीर्द राहिलेली आहे. १९७२ ते २०१४ दरम्यान सलग ११ वेळा निवडणुका जिंकण्याचा विक्रम त्यांनी केलाय. शिवाय कर्नाटकच्या राजकारणात तर एक मोठा चेहरा म्हणून खर्गे यांना ओळखलं जातं. २००५ साली त्यांची कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर लगेचच झालेल्या पंचायत निवडणुकांमध्ये भाजप आणि जेडीएसच्या तुलनेत काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या आणि कर्नाटकच्या ग्रामीण भागात काँग्रेसचा बोलबाला झाला. (काँग्रेस अध्यक्षपदासाठी मतदान संपलं, जर शशी थरूर पराभूत झाले तरी होईल इतिहास!) २०१४ मध्ये गुलबर्गा संसदीय मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत खर्गे यांनी भाजपच्या प्रतिस्पर्ध्याला ७३००० हून अधिक मतांनी पराभूत केलं होतं. तेव्हा २०२३ मध्ये कर्नाटकाच्या निवडणुकांमध्ये खर्गे यांचा पक्षाला फायदा होऊ शकतो. शिवाय सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे खर्गे दलित आहे आणि सध्याच्या राजकारणात जात फॅक्टर महत्वाचा ठरत असताना खर्गे यांचं दलित कार्ड कमी येऊ शकतं, असं विश्लेषक सांगतात. शशी थरूर यांचं स्वतंत्र बळ किती ? ते अध्यक्ष होण्याचा पक्षाला काय फायदा? खर्गे यांच्या विरुद्ध आहेत शशी थरूर. त्यांच्याबद्दल सांगायचं तर २००९ मध्ये थरूर राजकारणात उतरले आणि आज बघितलं तर दक्षिणेतील महत्वाचे काँग्रेस नेते म्हणून त्यांची ओळख आहे. केरळच्या तिरुवनंतपुरम या लोकसभा मतदारसंघातून शशी थरूर हे २००९, २०१४ आणि २०१९ असे सलग तीन वेळा खासदार राहिले आहेत. शिवाय UPA सरकारमध्ये थरूर यांनी परराष्ट्र राज्यमंत्री आणि मानव संसाधन विकास मंत्रीपद भूषवलं आहे. राष्ट्रीय राजकारणासोबत आंतरराष्ट्रीय राजकारणाची मजबूत समज थरूर यांना आहे. युनायटेड नेशन्समध्ये त्यांनी ३० वर्ष काम केलं आहे. व्हिएतनामच्या बोट पीपल क्रायसिसच्या वेळेस थरूर यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. जगभरात शांततेसाठी प्रयत्न करणाऱ्या पीस किपींग कमिटीचे ते हेड होते. आंतरराष्ट्रीय संबंध आणि घडामोडींमध्ये डॉक्टरेट पदवी त्यांच्याकडे आहे. हीच आंतरराष्ट्रीय राजकारणाची मजबूत समज थरूर यांना देशपातळीवरील राजकीय धोरण बनवण्यासाठी अजून परफेक्ट बनवते. (…तरच भारत-चीन संबंध सुधारतील, परराष्ट्र मंत्र्यांचं रोखठोक मत) शशी थरूर हे भाजपच्या नेत्यांना आंतरराष्ट्रीय राजकारण, अर्थशास्त्र, गवर्नन्स, बेरोजगारी प्रत्येक विषयांवर आव्हान देताना दिसतात. शिवाय ते सोशलमीडिया समजलेले नेते आहेत. यासर्वांमुळे शहरी मतदार ते खेचून आणू शकतात. याचा पुरावा म्हणजे २०१४ आणि २०१९ च्या मोदी लाटेतही शशी थरूर निवडून आले होते. शिवाय पक्षात ज्या नेत्यांना गांधी घराण्याचं नेतृत्व नकोय त्यांची संख्या वाढत आहे. अशा असंतोष पसरलेल्या पक्षनेत्यांच्या पाठबळ नक्कीच थरूर यांना असणार, असं विश्लेषक सांगतात. थरूर यांचं जी-२३ मधील निवडक नेत्यांपैकी एक असणं हे त्यासाठी पुरेसं आहे. एक मात्र नक्की, शशी थरूर विजयी झाले तर गांधी घराण्याचं काँग्रेसवरील नियंत्रण कमी होण्याची शक्यता असणार आहे, असं राजकीय विश्लेषक सांगतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या