मुंबई, 9 सप्टेंबर : काँग्रेसची (Congress) आजची अवस्था जमीन नसलेल्या जुन्या जमीनदारासारखी झाली आहे, असं स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मांडलं आहे. मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीमध्ये पवारांनी काँग्रेसबाबत आपली भूमिका मांडली. ‘उत्तर प्रदेशमधल्या जमीनदारांकडे मोठी शेती आणि हवेली होती, पण लँड सिलिंगचा कायदा आला आणि त्यांच्या जमिनी गेल्या आणि हवेली राहिली. जुनी झालेली ही हवेली दुरुस्त करण्याची ताकद त्या जमीनदारांमध्ये उरली नाही. हजार एकर जमीन 15-20 एकरावर आली. सकाळी उठून जमीनदार हवेलीच्या बाहेर बघतो तेव्हा त्याला समोर हिरवं पिक दिसतं, तेव्हा तो हे सर्व पीक माझं होतं, असं सांगतो, पण आता नाही,’ असं म्हणत पवारांनी काँग्रेसच्या आताच्या परिस्थितीबाबत रोखठोक भाष्य केलं. काँग्रेसकडून राहुल गांधींना पंतप्रधानपदासाठी प्रोजेक्ट केलं जातं, त्यावरही पवारांना प्रश्न विचारण्यात आला. काँग्रेसचे नेत आपल्या नेतृत्वाबद्दल वेगळी भूमिका घ्यायच्या मनस्थितीमध्ये नसतात, असं उत्तर पवारांनी दिलं. काँग्रेस एकेकाळी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत होती, पण आता तसं नाही, हे मान्य केलं पाहिजे. तेव्हा विरोधी पक्षांची जवळ यायची प्रक्रिया सुरू होईल. काँग्रेसची दूरवस्था झाली असली तरी तो पक्ष आजही रिलिव्हन्स असलेला पक्ष आहे, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं.