पाटणा, 25 फेब्रुवारी : महिलांचा होणार छळ रोखण्यासाठी, महिलांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी महिला हेल्पलाइनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पण या हेल्पलाइनवर पीडित पुरुषांच्याही तक्रारी येऊ लागल्या आहेत. बिहारच्या पाटणातील एका पुरुषानं आपल्या पत्नीविरोधात (wife) तक्रार दिली आहेत. पत्नीच्या जाचाला वैतागलेल्या नवऱ्याने (Husband) महिला हेल्पलाइनकडे धाव घेतली आहे. मंदिरीत राहणाऱ्या तरुणानं मंगळवारी महिला हेल्पलाइनकडे आपली व्यथा मांडली. मी माझ्या पत्नीला वैतागलो आहे. ती मला मारते, आता तर मी फोनवरही बोलू शकत नाही. काय करू काहीच समजत नाही, असं म्हणत त्यानं महिला हेल्पलाइनकडे दाद मागितली. महिला हेल्पलाइनकडे तक्रार देताना पतीनं सांगितलं, “माझी बायको मला खूप मारते. तिच्या मनासारखं काही झालं नाही तर ती असं करते. छोट्या छोट्या कारणावरून संशय घेते. दिवसभर माझ्यावर नजर ठेवते. तिच्या शिकवण्यानुसार मुलंही माझ्यावर लक्ष ठेवून असतात. आता तर तिनं त्याचा मोबाइल फोनही हॅक केला आहे. त्यामुळे मी कुणाशी बोलतो हे तिला माहिती होतं” महिला हेल्पलाइननं पतीची व्यथा ऐकून घेतली. त्यानंतर त्याच्या पत्नीचीही बाजू ऐकली. पत्नी म्हणाली, “माझा नवरा रिअल इस्टेटचं काम करतो. त्याचे अनेक महिलांसोबत संबंध आहेत. गेल्या कित्येक महिन्यांपासून तो माझ्याकडे लक्ष देत नाही. फोन केला तरी बिझी येतो. त्यामुळे मी माझ्या पतीला वैतागले आहे” हे वाचा - 8 वर्षांनी सापडला बेपत्ता नवरा, पण घराऐवजी तिनं थेट दाखवला कोर्टाचा रस्ता दैनिक जागरण च्या वृत्तानुसार नवरा-बायको दोघांनीही एकमेकांना वैतागल्याचं सांगितलं. दोघांचंही म्हणणं ऐकून घेतल्यानंतर हेल्पलाइनच्या अधिकाऱ्यांनी नवरा-बायकोला दहा दिवसांची वेळ दिली आहे. या कालावधीत त्यांनी त्यांना असलेल्या समस्यांवर तोडगा काढावा. काहीतरी मार्ग काढावा आणि तरी त्यांच्यातील वाद मिटले नाही, असंच कायम राहिलं तर मग महिला हेल्पलाईन पुढील कारवाई करणार आहे.