प्रशांत लीला रामदास, प्रतिनिधी नवी दिल्ली, 12 जानेवारी : भारत-चीन संबंध (India-China relation) पुन्हा ताणले गेले आहेत. विशेष म्हणजे सीमावादाच्या (Bounderism) प्रश्नावरुन दोन्ही बाजूच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची आज महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत लष्करप्रमुख मनोज नरवणे स्वत: उपस्थित होते. या बैठकीनंतर मनोज नरवणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पाकिस्तानला दहशतवाद्याच्या मुद्द्यावरुन खडेबोल सुनावले. तसेच सीमावादाच्या प्रश्नावरुन युद्ध करण्याची वेळ आली तर आम्ही जिंकूच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच सीमेवरचा धोका अद्यापही टळलेला नाही. पलीकडून अजूनही घुसखोरी सुरु असल्याचं नरवणे यावेळी म्हणाले. लष्करप्रमुख मनोज नरवणे नेमकं काय म्हणाले? “आमची चीनसोबत 14 वेळा चर्चा झाली. गेल्या काही वर्षात सीमेवर परिस्थिती सुधारली. पण गेल्या 2 वर्षातील परिस्थिती ही आव्हानात्मक ठरली. येत्या काळात आम्ही अजूनही चांगली कामगिरी करु. देशातील माध्यमांकडून आम्हाला अपेक्षा आहे. सीमेवरचा धोका अजून टळला नाहीय. पलीकडून अजूनही घुसखोरी सुरुच आहे”, असं मनोज नरवणे यांनी सांगितलं. मनोज नरवणे यांच्या पत्रकार परिषदेतील काही व्हिडीओ ‘एनएनआय’ वृत्तसंस्थेने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहेत. या व्हिडीओत नरवणे सीमावादाच्या मुद्दावर आपली भूमिका मांडताना दिसत आहेत. “चर्चा हा भांडण किंवा वाद मिटविण्यासाठी एक चांगला पर्याय आहेच. पण त्यातूनही प्रश्न सुटला नाही, युद्धजन्य परिस्थिती झाली किंवा युद्ध झालं तर भारतच जिंकेल”, असं लष्करप्रमुख एम.एम. नरवणे एका व्हिडीओत बोलताना दिसत आहेत.
‘आम्हाला भाग पाडलं तर त्याची थेट किंमत वसूल करु’ “दहशतवाद अजिबात खपवून घेतला जाणार नाही. एलओसीजवळ घुसखोरीचे प्रकार वाढले आहेत. पश्चिम सीमा भागातील नियंत्रण रेषेजवळ परिस्थिती सुधारत आहे. पण तिथे दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. भारत दहशतवाद अजिबात खपवून घेणार नाही. आम्हाला भाग पाडलं तर त्याची थेट किंमत वसूल करु”, अशा कडक शब्दांमध्ये नरवणे यांनी पाकिस्तानला सुनावलं.
दोन वर्षांपूर्वी चीनी सैन्याने गलवान खोऱ्यात घुसखोरी करुन चिनी झेंडा फडवला होता. त्यांच्या या कृत्या भारतीय लष्कराच्या जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं होतं. भारतीय जवान आणि चिनी सैनिक यांच्यात त्यावेळी मोठी झडप झाली होती. तेव्हापासून सीमावादाचा प्रश्नावरुन भारत आणि चीन यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत.