लखनऊ 16 ऑगस्ट : अपघाताची एक अतिशय विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एक अनियंत्रित ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या एका घरामध्ये शिरला. यानंतर घरामध्ये असलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय ट्रकमध्ये असलेल्या दोघांचाही मृत्यू झाला. त्यामुळे या दुर्घटनेत चार जणांनी आपला जीव गमावला. ही घटना उत्तर प्रदेशच्या मैनपूरीमधून समोर आली आहे. रात्री उशिरा हा अपघात झाला. Vinayak Mete Death : विनायक मेटेंच्या अपघाताचा ट्रक सापडला, ड्रायव्हरला अटक या घटनेत 5 जण गंभीर जखमी झाल्याचंही सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकमध्ये रॉड भरलेले होते. अचानक ट्रक चालकाचं नियंत्रण सुटलं आणि तो रस्त्याच्या कडेला असलेल्या एका घरात घुसला. त्यावेळी त्या घरात निवृत्त उपनिरीक्षक आणि त्यांची पत्नी उपस्थित होते. ही धडक इतकी जोरदार होती की पती-पत्नी दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडली तेव्हा निवृत्त निरीक्षक आणि त्यांची पत्नी झोपले होते. दुसरीकडे ट्रकमध्ये एकूण सात लोक प्रवास करत होते, यातील दोघांचा मृत्यू झाला. तर, पाच जण जखमी असल्याचं समोर येत आहे. मैनपूरीचे एसपी कमलेश दीक्षित यांनी या घटनेबद्दल सविस्तर माहिती दिली. सध्या घटनास्थळी पोलीस बंदोबस्त असून, ढिगाऱ्याखाली अजूनही एक जण अडकल्याची भीती आहे. त्यामुळे, क्रेनच्या सहाय्याने ढिगारा हटवला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच आजूबाजूचे लोक रात्री घटनास्थळी जमा झाले. पोलिसांनी मृतांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. दरम्यान ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या घरामध्ये कसा घुसला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. चालक भरधाव वेगाने ट्रक चालवत होता, तो नशेत होता की त्याला झोप लागली होती? असे अनेक प्रश्न आहेत. मात्र, आतापर्यंत एकाही प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून तपासानंतरच याबद्दलची माहिती समोर येईल.