खरगोन, 8 ऑगस्ट : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात, बडवाहजवळील काटकूट नदीला आलेल्या पुरात 14 कार वाहून गेल्या. यातील 3 कारला बाहेर काढण्यात आले आहे. नदीतील पाणी कमी असताना, इंदूरमधील काही जण आपल्या परिवारासह सहलीवर आले होते. मात्र, त्याचवेळी नदीतील पाण्याची पातळी वाढली. अचानक वाढलेल्या पाण्याच्या पातळीमुळे या लोकांना सावरायलाही वेळ मिळाला नाही. नेमकं काय घडलं - सर्वांनी घाईघाईने आपापले सामान नदीत टाकून पळ काढला. त्यांच्या कार आणि सामान पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे पोलिसांनी सोमवारी सांगितले आहे. रविवारी दुपारी ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी झाली होती. त्यांनी या लोकांना मदत केली. नदीत अडकलेल्या कार ट्रॅक्टर आणि दोरीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदूरचे लोक सकाळपासून येथे महिला आणि मुलांसोबत पार्टी करण्यासाठी आले होते, त्यादरम्यान अचानक वरच्या भागातून नदीचे पाणी वाढले. लोकांना गाडी बाहेर काढण्याची संधीही मिळाली नाही. तीन वाहने वाहून गेली आहेत, तर काही वाहने पाण्यात अडकली आहेत.
अतिरिक्त पोलिस अधीक्षक जितेंद्र सिंह पवार यांनी सांगितले की, रविवारी संध्याकाळी बलवारा पोलिस स्टेशन हद्दीतील कटकूट जंगलातील सुकरी नदीजवळ इंदूरमधील लोकांचा एक गट पिकनिकला जात असताना ही घटना घडली. ओखला व अकाया गावाजवळील जंगलात पाणी साचल्याने हा पूर आला असून नदीच्या काठावर उभ्या असलेल्या गाड्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. त्यांनी सांगितले की, जेव्हा लोक पिकनिकसाठी आले होते तेव्हा नदीत पाणी कमी होते आणि काही लोक नदीभोवतीही कार चालवत होते. मात्र, सुदैवाने ते उंच ठिकाणी असल्याने त्यांचे प्राण वाचले. हेही वाचा - आता फास्टॅगच काय, टोल नाकेही होणार हद्दपार, ‘या’ नव्या टेक्नॉलॉजीने होणार टोल वसुली! तर इंदूर जिल्ह्यातून लोक ओखलाजवळील हनुमान आणि शिव मंदिरांना भेट देण्यासाठी आणि घनदाट जंगलात सहलीसाठी येतात. खरगोनचे पोलीस अधीक्षक धरमवीर सिंग यादव यांनी परिसरातील पोलिसांना सुकरी नदीला अचानक आलेल्या पुराबाबत, येणारे पर्यटक सतर्क राहतील, यासाठी फलक लावण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.