नागपूर, 12 जून: कोरोना विषाणूचा संसर्ग (Corona pandemic) सुरू झाल्यापासून अनेकांनी या विषाणूचा धसका घेतला आहे. अगदी साधी सर्दी, खोकला झाला तरी घरातील सदस्य घाबरून जात आहेत. अशात अशा घाबरलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना लुटणाऱ्या बोगस डॉक्टरांच्या (fake doctor) अनेक घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. यानंतर अशीच एक घटना नागपूरातून (Nagpur) देखील समोर आली आहे. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाह्य रूग्ण विभागात उभा राहून हा बोगस डॉक्टर रुग्णांच्या नातेवाईकांना लुटत होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी डॉक्टरला बेड्या ठोकल्या आहे. संबंधित आरोपीचं नाव सिद्धार्थ जैन असून, तो मूळचा अहमदाबाद येथील रहिवासी आहे. आरोपी सिद्धार्थ जैन आपल्या नावाची प्लेट असलेलं ॲप्रन परिधान करून नागपूरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या मेडिसीन विभागात निवासी कॅज्युलिटी मेडिकल ऑफिसर म्हणून वावरायचा. दरम्यान गळ्यात स्टेथेस्कोप अडकवून तो गरीब व गरजू रुग्णांना हेरायचा आणि त्यांच्याशी संपर्क साधून रुग्णाला चांगल्या उपचाराची हमी देत पाच ते दहा हजार रुपये उकळत होता. मागील बऱ्याच दिवसांपासून त्याने हा फसवणूकीचा व्यवसाय सुरू ठेवला होता. रुग्णालयातील अनेक कर्मचाऱ्यांना आणि डॉक्टरांनादेखील त्याच्यावर संशय होता. पण तो अचानक रुग्णालयातून गायब होतं असायचा, त्यामुळे वरिष्ठ डॉक्टरांच्या तावडीत तो सापडत नव्हता. पण शुक्रवारी हा बोगस डॉक्टर मेडिकलच्या मेडिसीन विभागाचा निवासी डॉक्टर असल्याचं सांगत कोरोना संशयित रुग्णांचे नमुने घेण्यासाठी आला होता. याची माहिती खऱ्याखुऱ्या मेडिकल ऑफिसरला समजताच, त्यांनी पाठलाग करून बोगस डॉक्टरला पकडलं आहे. यानंतर आरोपी जैनला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. हे ही वाचा- राज पांडेचा आवाज ऐकून नागपूरकर हळहळले, कुटुंबीयांशी बदला घेण्यासाठी झाली हत्या, VIDEO याप्रकरणी पोलिसांनी चौकशी केली असता, संबंधित आरोपीने बीएसस्सी नर्सिंगचं शिक्षण घेतल्याचं समोर आलं आहे. त्याचबरोबर त्याला पुढे डॉक्टरही बनायचं होतं. पण, काही कारणास्तव त्याला डॉक्टर बनता आलं नाही. त्यामुळे त्याने बोगस डॉक्टर बनून रुग्णांच्या नातेवाईंची लुट सुरू केली होती. दरम्यानच्या काळात त्याने उपचाराच्या नावाखाली असंख्य रुग्णांना गंडा घातल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.