मुंबई, 8 मार्च : महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होतो आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, रेल्वे विभागाकडून विना मास्क प्रवास करणाऱ्यांवर दंड आकारला जात आहे. पश्चिम रेल्वेने (Western Railways) 1 ते 6 मार्चपर्यंत एकूण 8.83 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. रेल्वेकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी पश्चिम रेल्वेने बीएमसीसह (BMC) मिळून फेब्रुवारीदरम्यान, एकूण 5.97 लाख रुपयांचा दंड वसूल केला होता. रेल्वेकडून दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेने 1 ते 6 मार्च या दरम्यान जे प्रवासी विना मास्क प्रवास करत होते, त्यांच्यावर कारवाई करत दंड आकारला आहे. 3819 लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर 26 फेब्रुवारी रोजी एकाच दिवसांत सर्वाधिक 430 जणांवर कारवाई करण्यात आली. यातून 75,200 रुपये रक्कम जमा झाली.
रेल्वेला 17000 कोटींचं नुकसान - सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना संकट काळात रेल्वेला जवळपास 17000 कोटी रुपये नुकसान झालं. गेल्या वर्षीच्या तुलनेत रेल्वेला भाड्यातून मिळाणाऱ्या महसुलात 8283 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. 2020 मध्ये कोरोनामुळे रेल्वेने सर्व ट्रेन सेवा रद्द केल्या होत्या. 12 मेनंतर श्रमिक स्पेशल ट्रेन आणि काही इतर रेल्वे सेवा सुरू करण्यात आल्या. देशभरात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 11,141 नवे कोरोनाबाधित आढळले असून 38 जणांचा मृत्यू झाला आहे. तर मागील 24 तासांत 6013 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 99,205 इतकी आहे.