विधान परिषद निवडणुकीसाठी 10 जागांसाठी 20 जून रोजी निवडणूक होणार आहे. 10 जागांसाठी 11 उमेदवार मैदानात असल्यामुळे घोडेबाजाराला पुन्हा ऊत येणार आहे
मुंबई, 14 जून : राज्यसभा निवडणुकीमध्ये पानिपत झाल्यामुळे शिवसेनेनं विधान परिषद निवडणुकीसाठी (vidhan parishad election maharashtra 2022) मोर्चबांधणीला सुरुवात केली आहे. शिवसेनेनं (shivsena) आपल्या आमदाराला निवडणुकीच्या दोन दिवसांआधीच आमदारांना हॉटेलमध्ये हलवण्याची व्यवस्था केली आहे. तर भाजपनेही पाचवा उमेदवार कसा निवडून आणावा यासाठी बैठक बोलावली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी 10 जागांसाठी 20 जून रोजी निवडणूक होणार आहे. 10 जागांसाठी 11 उमेदवार मैदानात असल्यामुळे घोडेबाजाराला पुन्हा ऊत येणार आहे. राज्यसभा निवडणुकीत आधीच शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला आहे. त्यामुळे शिवसेनेनं आतापासून फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. राज्यसभा निवडणुकीनंतर विधान परिषद निवडणुकीसाठीही पुन्हा एकदा हॉटेल पॉलिटिक्स सुरू झाले आहे. शिवसेनेचे सर्व आमदार आणि समर्थक अपक्ष आमदारांना दिनांक 18 ते 20 जून रोजी पवई येथील “हॉटेल रिनासंन्स” मध्ये मुक्कामी असणार आहे. याच हॉटेलमधून सर्व आमदार 20 जून रोजी विधान भवनात मतदानासाठी जाणार आहे. ( IPL मीडिया राईट्समध्ये Viacom18 ची बाजी, स्टारला पुन्हा संधी! ) तर दुसरीकडे, भाजपनेही बैठकांना सुरुवात केली आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजप रणनीतीने आखण्यास सुरुवात केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर खास शिलेदारांची बैठक बोलावली आहे. आशिष शेलार यांच्यासह उमेदवार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांना बोलावले आहे. राज्यसभा निवडणुकीच्या यशामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे पाचवी जागा निवडून आणण्यासाठी खलबत सुरू आहेत. भाई जगताप पोहोचले हितेंद्र ठाकूर यांच्या घरी दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस नेते भाई जगताप यांनी बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. राज्यसभेत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीने पुन्हा दगाफटका होऊ नये म्हणून आतापासून कंबर कसली असून अपक्षांमध्ये जास्त मते असणारे बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची मनधरणी करण्यासाठी भाई जागताप यांनी भेट घेतली. यावेळी हितेंद्र ठाकूर यांनी, भाई जगताप हे मत द्यावे, अशी विनंती करण्यासाठी आले असल्याचे सांगितलं.