मुंबई, 2 फेब्रुवारी : फेब्रुवारी महिना आला की व्हॅलेंटाईन वीक सुरू होतो. त्यामुळे विविध गिफ्ट्स, कार्ड्स अशा अनेक वस्तूंची खरेदी केली जाते. पण व्हॅलेंटाईन डेच्या नावाने फसवणुकीचा मोठा प्रकारही घडू शकतो. कोणत्याही फसवणुकीपासून वाचण्यासाठी ठाणे पोलिसांकडून जनतेला सतर्क करण्यात आलं आहे. ठाणे पोलिसांनी ट्वीटरवरून याबाबत माहिती दिली आहे. व्हॅलेंटाईन डेच्या अनुषंगाने समाजमाध्यमांवर मोबाईल फोन, गिफ्ट्स स्किम, ताज हॉटेल कार्ड्स स्किम्स याबाबत फसवणूक करणाऱ्या लिंक व्हायरल होत आहेत. नागरिकांनी अशा खोट्या, फसव्या लिंकला कोणताही रिप्लाय करू नये, लिंकवर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
पोलिसांनी ट्वीटसोबत काही फोटोही जोडले आहेत. यात व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी ताज हॉटेल गिफ्ट कार्ड असं लिहून एक लिंक जोडली आहे. त्यात सात दिवस मोफत ताज हॉटेलमध्ये राहण्याची संधी मिळाल्याचं म्हटलंय. प्रश्न-उत्तरांच्या स्पर्धेत सहभागी होऊन मोबाईल फोन जिंकण्याची संधी असल्याचा मेसेजही एका लिंकसह देण्यात आला आहे. परंतु या लिंक, या स्किम खोट्या, बनावट असून अशाप्रकारच्या कोणत्याही लिंकवर क्लिक न करण्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहं.
दरम्यान, कोरोना काळात ज्या प्रमाणे डिजिटल व्यवहारात वाढ झाली आहे, त्याच वेगात ऑनलाईन फसवणुकीचं प्रमाणही वाढलं आहे. खोट्या लिंकद्वारे लोकांची फसवणूक झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्याच प्रार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी व्हॅलेंटाईन डेसाठी लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.