मुंबई, 17 ऑगस्ट : ‘डॉक्टरांपेक्षा कम्पाउंडर बरा’ अशा वक्तव्यामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका होत आहे. भाजपने त्यांच्या विधानावर जोरदार आक्षेप घेत माफी मागावी अशी मागणी केली आहे. अखेर संजय राऊत यांनी या प्रकरणावर आपल्या स्टाइलने खुलासा करत भाजपला फटकारून काढले आहे. ‘डॉक्टर मंडळी आपलीच आहेत. जेव्हा ते अडचणीत आलेत त्यावेळी मी व्यक्तीशा त्यांची मदत केली आहे. डॉक्टरांच्या विरोधात जेव्हा भरमसाठ बिलं आली म्हणून आंदोलनं केली त्यावेळी मीच मध्यस्तीची भूमिका केली आणि डॉक्टरांची बाजू घेतली होती. माझ्याकडून डॉक्टरांचा अपमान झालेला नाही’ असं राऊत यांनी स्पष्ट केले. ‘एका विशिष्ट राजकीय विचारांची लोकं मोहीम चालवत असतील तर योग्य नाही. माझ्याकडून डॉक्टरांचा अपमान झालेला नाही. बोलण्याच्या ओघात माझ्याकडून कोटी झाली. गैरसमज कुणी करू नये, माफी मागण्यास काही जण सांगत आहेत पण मी अपमानच कुणाचा केलेला नाही’ असंही राऊत यांनी ठामपणे सांगितले. ‘डॉक्टरांचे आम्ही सदैव संरक्षण दिले आहे. नरेंद्र मोदी यांनी लंडनला जाऊन डॉक्टरांचा अपमान केला. आमचे डॉक्टर जास्त पैसे घेतात. त्यावर तिथल्या डॉक्टरांनी निषेध केला. मग मोदींचा निषेध का करत नाही? असा पलटवार राऊत यांनी भाजपवर केला. तसंच, ‘शाब्दिक कोटी समजून घ्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर, मनमोहन सिंग यांच्यावरही कोटी होतात. माझ्या मनात डॉक्टरांच्या सर्व सहकार्याविषयी सन्मान आहे. मी कम्पाउंडरचा सन्मान केला म्हणून एका पक्षाने मोठी भूमिका घेण्याची आवश्यकता नाही. या विषयातील राजकारण थांबवायला हवे’ असंही राऊत म्हणाले. त्यानंतर राऊतांनी आपला मोर्चा जागतिक आरोग्य संघटनेकडे वळवला. WHO आता राजकीय संघटना झाली आहे. एका देशाची बांधिल आहे. अमेरिकेनं तर जाहीरपणे सांगितले आहे who हेच अनेक देशांत संसर्ग होण्यामागे जबाबदार आहे. रशियाने निषेध केला अमेरिकेने विरोध केला मग आता रशिया आणि अमेरिकेचा निषेध करणार का? असा थेट सवाल राऊतांनी उपस्थितीत केला आहे. ‘शरद पवार यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली. पण त्यांनी काळजी घ्यावी, पण ते ऐकणार नाहीत. पवार कुटुंबीय वाद मिटवण्यात ते सक्षम आहे. पवार कुटुंबाची वज्रमूठ कायम आहे. मौनात ताकद आहे. अजित पवार हे राज्य सरकारचा महत्वाचा खांब आहे’ असंही राऊत म्हणाले.