मुंबई, 12 जुलै : मुंबईतील शिवसेनेच्या पहिल्या नगरसेविका आणि शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Shital Mhatre) थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मुंबई महापालिकेत (BMC) शिवसेनेला खिंडार पडण्यास सुरुवात झाली आहे. शीतल म्हात्रे या दहीसर पश्चिम येथील वॅार्ड क्रमांक ७ च्या नगरसेविका आहेत. शीतल म्हात्रे दोन वेळा नगरसेवकपदी निवडून आल्या आहेत. (Shiv Senas first corporator shital mhatre in eknath Shinde group) शिवसेना प्रवक्ते पदी शीतल म्हात्रे यांची नेमणूक करण्यात आली आहे. मुंबईतील आमदारांपाठोपाठ आता नगरसेवक ही एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी व्हायला सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदे समर्थक शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली शीतल म्हात्रे यांचा एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभाग झाल्याचं सांगितलं जात आहे. दोनच दिवसांपूर्वीच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दहीसर, बोरिवली आणि मागाठाणे मतदारसंघात निष्ठा यात्रा काढली होती. त्यानंतरही शिवसेनेत राजकीय फुट सुरुच आहे.