मुंबई, 20 फेब्रुवारी : अनेक वेळा आपण पाहतो की राजकीय विरोधक एकाच मंचावर किंवा एकाच ठिकाणी येण टाळतात. पण मुंबईत मात्र आज शिवजयंती निमित ठेवण्यात आलेल्या कार्यक्रम एकमेकांचे कट्टर विरोधक मजेशिरपणे टाळ्या देवून गप्पा मारत होते. तर एका ठिकाणी राजकीय नेत्याला घेराव करण्यासाठी आलेल्या लोकांना घेराव करण्याचाच विसर पडला. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ इथं आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला काँग्रेस आमदार भाई जगताप आणि भाजप आमदार आशिष शेलार हे बाळ शिवाजीचा पाळणा एकाच वेळी हलवताना दिसले. मुख्य म्हणजे पाळणा गायला जात असताना शेलार मामाच्या नावाचा उल्लेख झाला. हा उल्लेख होताच आशिष शेलार आणि भाई जगताप यांना हसू आवरले नाही. दोघांनीही एकमेकांना टाळी देत हशा पिकवला. ही घटना बघून अनेकांना हसू आले तर काहींना आश्चर्याचा धक्का बसला. दोघांनीही कुठलीही राजकीय प्रतिक्रिया न देता महाराष्ट्रातल्या जनतेला शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आणि आपापल्या दिशेने निघून गेले. दुसरी घटना अशी की मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी अचानकपणे सेवेन हिल्स रुग्णालयाला भेट दिली. मुंबईत कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन त्यांनी अनेक ठिकाणी अचानक पोहोचून तिथल्या तयारीचा आढावा घेतला. महापौर आल्याची माहिती मिळताच या हॉस्पिटलमध्ये असलेले महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे नेते मनोज चव्हाण तिथे पोहोचले. सेव्हन हिल्स रुग्णालय खाजगी कंपनीला चालवण्यासाठी दिले जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. अशा प्रसंगी तिथले मनसेच्या कामगार सेनेचे हजार कर्मचारी बेरोजगार होतील. कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येवू नये म्हणून आज मनोज चव्हाण महापौर यांना घेराव घालण्यात होते. पण मनोज चव्हाण यांना पाहताच महापौर यांनी त्यांना शिवजयंतीसाठी पुढे बोलावलं आणि त्यांचाही योग्य असा सन्मान केला .त्यामुळे मनोज चव्हाण यांनी घेरावाचा विचार सोडून शिवजयंती साजरी केली आणि आपल्या मागण्यांची माहिती महापौरांना दिली.