महाराजांसमोर नतमस्तक होणाऱ्या फोटोसह संभाजीराजेंचं सूचक ट्विट, "महाराज.... "
मुंबई, 26 मे : राज्यसभेच्या (Rajya Sabha Election) रिक्त होणाऱ्या जागांपैकी सहाव्या जागेवर संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आणि सर्वपक्षीय आमदारांनी आपल्याला पाठिंबा द्यावा असं पत्रही त्यांनी लिहिलं. त्यानंतर शिवसेनेकडूनही संभाजीराजेंना ऑफर देण्यात आली. मात्र, संभाजीराजेंकडून शिवसेनेच्या ऑफरवर प्रतिक्रिया न आल्याने अखेर शिवसेनेने संजय पवार यांना सहाव्या जागेवरुन उमेदवारी देण्याचं ठरवलं. त्यामुळे संभाजीराजेंचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. त्याच दरम्यान आज संभाजीराजे छत्रपती यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर नतमस्तक होणारा फोटो संभाजीराजेंनी शेअर केला आहे. हा फोटो पोस्ट करताना संभाजीराजेंनी लिहिलं, “महाराज… तुमच्या नजरेतलं #स्वराज्य मला घडवायचंय… मी कटीबद्ध असेन तो तुमच्या विचारांशी… मी बांधील असेन तो फक्त जनतेशी..”
संभाजीराजे यांनी केलेल्या या ट्विटमुळे आता संभाजीराजे काय निर्णय घेतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. शिवसेनेने संजय पवार यांना सहाव्या जागेसाठी उमेदवारी दिल्यानंतर आता संभाजीराजे अपक्ष निवडणूक लढणार की नाही? याबाबत अद्याप स्पष्टता नाहीये. तर जोपर्यंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सहाव्या जागेसाठी अधिकृत उमेदवाराची घोषणआ करत नाहीत तोपर्यंत संभाजीराजे प्रतिक्रिया देणार नाहीयेत. वाचा : आम्ही देखील पाहून घेऊ, ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांचा इशारा शिवसेनेकडून आज उमेदवारी अर्ज दाखल करणार राज्यसभेच्या सहा जागांसाठी महाराष्ट्रात निवडणुक होतेय. त्यासाठी शिवसेनेकडून दोन उमेदवार आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शिवसेना नेते संजय राऊत आणि कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार हे आज विधान भवनात दुपारी एक वाजता त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि मंत्रीही यावेळी उपस्थित रहाणार आहेत. गेले काही दिवस राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोण उमेदवार असणार यावरून मोठा वाद सुरू होता. युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज्य संघटना स्थापन केल्यामुळे त्यांनी स्व:ताची अपक्ष उमेदवारी जाहीर केली होती. त्यांनी शिवसेना पुरस्कृत उमेदवारी जाहीर करावी असा प्रस्ताव शिवसेनेकडे दिला होता मात्र शिवसेनेनं त्यांना पक्षात प्रवेशाची अट घातली होती. त्यामुळे स्वतंत्र बाणा जपणारे युवराज संभाजीराजे छत्रपती आणि शिवसेना यांच्यातील वाद टोकाला पोहचला होता. अखेर शेवटी शिवसेनेनं कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार यांची उमेदवारी जाहीर केली. आता संभाजीराजे ही त्यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करतायेत का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.