मनसेच्या एकमेव आमदाराचं मत कुणाच्या पारड्यात? काय आहे राज ठाकरेंचा आदेश?
विशाल पाटील, प्रितिनिधी मुंबई, 8 जून : राज्यसभा निवडणुकीला (Rajya Sabha Election 2022) आता अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. निवडणुकीसाठी मतदान होणार आहे आणि अधिकची जागा जिंकण्यासाठी कुठल्याच उमेदवाराकडे विजयासाठी आवश्यक इतकी मते नाहीयेत. त्यामुळे शिवसेनेला आपला दुसरा उमेदवार संजय पवार (Sanjay Pawar) तर भाजपला आपला तिसरा उमेदवार धनंजय महाडिक (Dhanajay Mahadik) यांना विजयी करायचा असेल तर लहान पक्ष, अपक्ष आमदारांच्या मतांची आवश्यकता आहे. त्यासाठी शिवसेना आणि भाजप नेत्यांकडून लक्षान पक्षांचे आमदार आणि अपक्ष आमदारांच्या भेटीगाठी घेण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (MNS President Raj Thackeray) भेटीला पोहोचले. आशिष शेलार आणि राज ठाकरेंच्या भेटीत काय ठरलं? मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आशिष शेलार यांनी भेट घेतली. ही भेट घेतल्यानंतर आशिष शेलार यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधताना म्हटलं, पक्षाच्या वतीने येत्या राज्यसभा निवडणुकीत मनसेचं जे एक मत आहे ते भाजप उमेदवाराला मिळावं अशी विनंती मी राज ठाकरेंना केली. मी धन्यवाद व्यक्त करतो की, राज ठाकरेंनी आमच्या विनंतीला मान दिला आणि मला सांगितलं. ते मत भाजपला मिळेल. त्यामुळे आमचा विजय अधिक सुकर आणि सोपा होईल. वाचा : Rajya Sabha: उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी ओवैसींची गुगली; भाजपला शह देण्यासाठी मविआ देणार का MIM ला टाळी? मनसेचे आमदार आम्हाला मतदान करतील. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे बोलत आहेत 100 % त्यांचे उमेदवार जिंकला जाईल, मात्र त्यांच्या पक्षातील आमदार यांना नजरकैदेत का ठेवले जात आहे. 10 तारखेला दिसून येईल मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है. राज्यसभेच्यावेळी उघड मतदान आहे मात्र विधानपरिषदेचं गुप्त मतदान आहे त्यावेळी बघू महाविकास आघडीचे किती मतदान अबाधित राहणार असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. भाजपला 18 मतांची आवश्यकता राज्यसभेच्या 6 जागांपैकी 2 जागा निवडून आणण्याची मतदान क्षमता भाजपकडे आहे. मात्र भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडीक यांना निवडून आणण्यासाठी भाजपला 18 अतिरिक्त मतांची बेगमी करावी लागणार आहे. भाजपने तिसरा उमेदार रिंगणात उतरवला आहे आणि त्यामुळे निश्चितच त्यांच्या विजयाचेही गणित सोडवण्यासाठी रणनिती आखली जात आहे. CMच्या भेटीनंतर अबू आझमींनी घेतला मोठा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी भेट घेतली. वर्षा निवासस्थानी समाजवादी पक्षाचे दोन्ही आमदार दाखल झाले. यानंतर अबू आझमींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा केली. या भेटीनंतर अबू आझमी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. अबू आझमी यांनी म्हटलं, आज मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मी त्यांच्यासमोर मागण्यांचा पाढा वाचला. माझ्या मागण्यांच्या संदर्भात सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.