मुंबई, 28 नोव्हेंबर: कोरोनाच्या (Corona Virus) नव्या ओमिक्रॉन (Omicron Variant) नव्या व्हेरिएंटनं सर्वाचीच चिंता वाढवली आहे. मुंबईतही या व्हेरिएंटचा सामना करण्यासाठी आधीपासून पावलं उचलण्यास सुरुवात झाली. शनिवारी नव्या स्ट्रेनबाबत चर्चा आणि पुढील नियोजन करण्यासाठी मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) प्रशासनाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. मुंबई महापालिकेनं मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस क्वॉरंटाईनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आफ्रिकेतून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना आता 14 दिवस क्वॉरंटाईन केलं जाणार आहे. त्यांची दर 48 तासांनी कोरोना टेस्ट केली जाईल.
परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची ट्रॅव्हल हिस्ट्री तपासली जाईल. जर एखाद्या व्यक्तीने गेल्या 14 दिवसांत आफ्रिकेतील कोणत्या देशाचा दौरा केला असेल तर त्याचीही तपासणी करण्यात येईल. याचप्रमाणे या बैठकीत मुंबईतील जम्बो कोव्हिड सेंटरचे फायर ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनासाठी राज्य सरकारची संपूर्ण नवी नियमावली राज्य सरकारची यंत्रण सतर्क झाली आहे. त्यामुळे कोविडचे नियम पाळण्यासाठी राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. जर कुणी कोरोनाची नियमावली भंग केली तर दंड भरावा लागणार आहे. हेही वाचा- मोठी अपडेट: आरोग्यमंत्री, टास्क फोर्ससोबत मुख्यमंत्र्यांची आज आढावा बैठक राज्यात कोविड-19 या आजाराचे रूग्ण कमी झाल्यामुळे राज्य शासनाने आर्थिक, सामाजिक, मनोरंजन आणि सांस्कृतिक क्षेत्रावरील निर्बंध पूर्णतः लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी शिथिल केले आहेत. राज्य शासन तसंच केंद्र शासनाकडून वेळोवळी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन सेवा देणारे, मालक, परवानाधारक तसंच आयोजक यासह सर्व सेवा घेणारे, ग्राहक, अतिथी अभ्यागत यांनी करावयाचे आहे. शनिवारी जारी केलेल्या या मार्गदर्शक तत्वात संपूर्ण लसीकरणाची आवश्यकता, कार्यक्रमावरील निर्बंधाची व्याख्या, कोविड अनुरूप वर्तन, स्थानिक प्रशासनाचे अधिकार, कोविड वर्तणूकविषयक नियम आणि दंड याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.