मुंबई, 22 फेब्रुवारी : महाराष्ट्रात सापडलेला कोरोना व्हायरसचा उपप्रकार (नवीन स्ट्रेन) हा अत्यंत संसर्गजन्य आणि धोकादायक असल्याची महिती एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली आहे. कोरोनाचा हा नवा उपप्रकार राज्यासाठी चिंतेचा आणि सरकारसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकतो. महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे. डॉ. गुलेरिया यांनी सांगितलं की, कोरोना व्हायरससाठी प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) ही महत्त्वाची आहे, कारण संपूर्ण लोकसंख्येपैकी 80 टक्के लोकांमध्ये अँटिबॉडीज म्हणजेच प्रतिजैविकं असणं गरजेचं आहे. तर त्याला हर्ड इंम्युनिटी तयार झाली असं म्हणता येईल. ते पुढे म्हणाले की, ‘या नव्या व्हेरिएंटमुळे अँटी बॉडी विकसित झालेल्या लोकांमध्ये पुन्हा संसर्ग होऊ शकतो.’ त्यामुळे लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये जर पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाला, तर समजायचं की कोरोनाच्या या नव्या उपप्रकाराची लागण झाली आहे. डॉ. गुलेरिया यांनी हे वक्तव्य अशा वेळी केलं आहे, जेव्हा महाराष्ट्र, केरळ, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि पंजाब या 5 राज्यांमध्ये अचानक गेल्या आठवड्याभरात कोरोना व्हायरस बधितांची संख्या वाढली आहे. या आणीबाणीच्या वेळी तीन कोटी आरोग्य सेवक आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. त्यानंतर 50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या किंवा को-मॉर्बिडीज असलेल्या 27 कोटी लोकांना लस देण्यात येईल.
हर्ड इम्युनिटी का साध्य होत नाही यावर सविस्तर बोलताना डॉ. गुलेरिया म्हणाले की, विषाणूतील उत्परिवर्तन किंवा व्हेरिएंट्समध्ये रोगप्रतिकारक शक्ती असते. ते लसीकरण किंवा रोगाच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीला मिळालेल्या रोगप्रतिकारक शक्तीला चॅलेंज निर्माण करू शकतात आणि पुन्हा संसर्ग होऊ शकतो. लसीकरणाचा कोरोनाच्या नव्या उपप्रकारावर किती परिणाम होईल हे सांगताना डॉ गुलेरिया म्हणाले की, कोविडच्या लसी प्रभावी ठरतील पण त्यांची कार्यक्षमता कमी असू शकते. म्हणजेच लोक हा संसर्ग टाळू शकणार नाहीत, पण कोरोनाची लागण सौम्य स्वरूपाची असेल. मात्र, लस घेणं आवश्यक आहे हे त्यांनी अधोरेखित केलं आहे.
दरम्यान, तज्ञांचा असा विश्वास आहे की, लॉकडाउन हा एक कठोर उपाय आहे. महाराष्ट्र टास्क फोर्सचे सदस्य आणि एंडोक्रिनोलॉजिस्ट डॉ. शशांक जोशी यांच्या मते, डबल मास्किंग (दोन थर असलेलं मास्क) आणि मायक्रो-कंटेन्ट झोनची निर्मिती प्रभावी संसर्ग रोखू शकते. कोरोना व्हायरस लसीचं वितरण विकेंद्रित केलं जावं. कोविन अॅपमध्ये काही समस्या आहेत, ज्या लसीकरण प्रक्रिययेत अडथळा ठरत आहेत. तसंच गेल्या आठवड्यापासून राज्यात संसर्गाच्या ताज्या वाढीमागे या विषाणूचे 240 हून अधिक नवे रुग्ण समोर आले असल्याचंही त्यांनी सांगितलं. जर राज्यसरकारला लसीकरणाबाबत निर्णयचा अधिकार मिळाला, तर अधिकाधिक लोकांना लशीचं संरक्षण देण्यात मदत होईल. कोविड-19 च्या उद्रेकातील महाराष्ट्र सरकारचे तांत्रिक सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी, कोरोन व्हायरसवरील लस सुरक्षित आहे कारण देशातील एक कोटी लोकांना लस देण्यात आली आहे आणि कोणाचाही मृत्यू झाला नाही किंवा गंभीर गुंतागुंत झाली नसल्याचं सांगितलं.