"वैफल्यग्रस्त भावनेतून अनंत गितेंचं वक्तव्य" राष्ट्रवादीचा पलटवार
मुंबई, 21 सप्टेंबर : शिवसेनेचे माजी खासदार अनंत गिते (Shiv Sena former MP Anant Geete) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या संदर्भात केलेल्या वकत्व्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. अनंत गिते यांच्या या विधानानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रतिक्रिया आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे (NCP leader Sunil Tatkare) यांनी पत्रकार परिषद घेत अनंत गिते यांच्यावर पलटवार केला आहे. वैफल्यग्रस्त भावनेतून अनंत गितेंनी वक्तव्य केलं आहे असा पलटवार सुनील तटकरे यांनी केला. आहे. सहनही होत नाही, सांगताही येत नाही अशी अनंत गितेंची अवस्था झाली आहे. अनंत गिते बोलल्याने काही फरक पडत नाही. गितेंच्या विधानावर शिवसेनेचे भूमिका स्पष्ट होईल, अशी अपेक्षा आहे असंही सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. तटकरे यांनी पुढे म्हटलं की, गितेंना समज द्यावी का हा शिवसेनेचा अंतर्गत मुद्दा आहे. ज्यांना राजकीय स्थान मिळत नाही ते अशी वक्तव्य करतात. अनंत गितेंच्या वक्तव्याला महत्त्व देऊ नये. शरद पवार महाराष्ट्राचे नेते आहेत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सरकार पाच वर्षे चांगले काम करेल. स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांशी संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न आहे.
नेमकं काय म्हणाले अनंत गिते? रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात राष्ट्रवादीतील काही स्थानिक नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्याच्या कार्यक्रमात भाषण करताना अनंत गिते यांनी थेट राष्ट्रवादी आणि शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. अनंत गिते यांनी म्हटलं, मला जाणीव आहे की शिवसेनेचा नेता या व्यासपीठावरुन बोलतोय. मी आज कोणतंही राजकीय भाष्य करणार नाहीये. शिवसेना काय आहे आणि शिवसैनिकांची जबाबदारी काय हे सांगत आहे. राज्यात आपलं सरकार आहे. आपलं कशासाठी म्हणायचं तर मुख्मयंत्री आपले आहेत. पण बाकी काँग्रेस, राष्ट्रवादी आपले नाहीत. आघाडीचं सरकार आहे. सत्ता आघाडीचे नेते सांभाळतील, तुमची आमची जबाबदारी काय आहे तर गाव सांभाळायचं आहे. आपलं गाव सांभाळायच असताना आम्हाला आघाडीचा विचार करायचा नाहीये… आघाडी आघाडीचं पाहून घेईल. शिवसेना ही काँग्रेसच्या विचाराची कदापी होऊ शकणार नाही या आघाडीत तीन घटक आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. काँग्रेस सुद्धा काँग्रेस आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा काँग्रेसच आहे. हे एकमेकांचे तोंज पाहत होते का, यांचं एकमेकांचं जमतय का, यांचा विचार एक आहे का? दोन काँग्रेस एक विचाराची होऊ शकत नाही तर शिवसेना ही काँग्रेसच्या विचाराची कदापी होऊ शकणार नाही असंही अनंत गिते म्हणाले. "…तर त्या काँग्रेस नेत्याला गाडीतून ओढून दोन लाथा घाला" मंत्री सुनील केदार यांचं वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून अनंत गिते पुढे म्हणाले, मुळात राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे. मग त्या दोन काँग्रेस जर एक होऊ शकत नाही तर आम्ही त्यांच्या विचाराचे होणं कदापी शक्य नाही. जरी राज्यात आघाडी सरकार असलं तरी आम्ही आघाडी सैनिक नाही आम्ही शिवसैनिक आहोत आणि शिवसैनिकच राहणार. दुसरा कुठलाही नेता त्याला कुणीही किती उपाधी देवो, कुणी जाणता राजा म्हणो.. कुणी आणखी काय म्हणो… पण आणचे गुरू तो होऊ शकत नाही. आमचे गुरू केवळ बाळासाहेब ठाकरे आहेत. ही आघाडी केवळ सत्तेची तडजोड आहे. ज्या दिवशी तुटेल त्या दिवशी तुम्ही आपल्याच घरी येणार. आपलं घर भक्कम करण्यासाठी आपल्याला ताकद वाढवायची आहे असंही अनंत गिते म्हणाले. संजय राऊत म्हणाले… अनंत गिते यांनी केलेल्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी म्हटलं, मला विषय माहित नाही, पवार साहेब आणि ठाकरे राज्याचे नेते आहेत. गितेंच्या वक्तव्याशी सरकारचा काहीही संबंध नाही. सरकार उद्धव ठाकरे चालवताहेत. सर्वांनीच ठाकरेंचे नेतृत्व स्वीकारले आहे.