मुंबई, 5 जानेवारी : मुंबईत कोरोनाचं प्रचंड थैमान सुरु आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येने तर आज पहिल्या आणि दुसऱ्या कोरोनाच्या लाटेचाही रेकॉर्ड मोडला आहे. मुंबईत दिवसभरात तब्बल 15 हजारांपेक्षाही जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे चाचणी करणाऱ्या प्रत्येक तीन जणांनंतर चौथी व्यक्ती कोरोनाबाधित आढळत आहे. त्यामुळे कोरोनाचा पॉझिटिव्ही रेट हा थेट 25 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत गेल्या 24 तासात तब्बल 15 हजार 166 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. कोरोनाबाधितांचा हा वाढता आकडा प्रचंड चिंता वाढवणारं आहे. कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी दर हा थेट 25 टक्क्यांवर पोहोचला आहे. कोरोना चाचणीत प्रत्येकी तीन रुग्णांनंतर चौथ्या रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह येतोय. त्यामुळे प्रशासनाचीदेखील चिंता वाढली आहे. प्रशासन या संकटाला सामोरं जाण्यासाठी सज्ज आहे. पण ही रुग्णवाढ लवकरात लवकर थांबवणं आणि कमी करणं हे प्रशासनापुढे आताच्या घडीतील सर्वात मोठं आव्हान आहे. याशिवाय कोरोनाचा रिकव्हरी रेट हा दोन टक्क्यांनी खाली घसरला आहे. हेही वाचा : कोरोनाचा धोका वाढला, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे वसतिगृह बंदचा निर्णय मुंबईत दिवसभरात आढळलेल्या एकूण कोरोनाबाधितांपैकी 13 हजार 195 रुग्णांमध्ये कोणतेही लक्षणे नाहीत. त्यांना उपचाराचा योग्य सल्ला देऊन होम क्वारंटाईन आणि इतर सल्ल्यानुसार क्वारंटाईन करण्यात आलं आहे. तर दिवसभरात 1218 रुग्णांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. कोरोनावर आज 714 जणांनी मात केलीय. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 3 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मुंबईत 462 इमारती सील मुंबईत कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता महापालिका देखील कामाला लागली आहे. महापालिकेने आतापर्यंत 462 इमारती सील केल्या आहेत. तसेच 20 कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आले आहेत. एका इमारतीत दहा पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास इमारत सील करण्यात येत आहेत. एखाद्या मजल्यावर कोरोनारुग्ण आढळल्यास तो मजला सील करण्यात येतोय. रुग्ण सापडलेल्या ठिकाणी तेथील नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात आलीय. तसेच त्या नागरिकांची देखील महापालिकेकडून टेस्ट केली जात आहे. नागरिकांची आरटीपीसीआर टेस्ट होईपर्यंत इमारत सील केली जातेय. तसेच रुग्ण आढळलेल्या परिसरातील नागरिकांनाही सक्तीचे 14 दिवस क्वारंटाईन राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती कधी निस्तारेल? महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर राहुल पंडित यांनी न्यूज 18 लोकमतला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी ही परिस्थिती सुधारावी यासाठी काय उपाययोजना करता येतील, या विषयी माहिती दिली. “नागरिकांनी जबाबदारीने वागले, गर्दी कमी केली, मास्क वापरलं तर आपण कोरोनाची ही लाट नियंत्रणात आणू शकतो. पण तसं घडताना दिसत नाहीय. बरेचजण अजूनही मास्क वापरताना दिसत नाहीय. ओमायक्रोन मास्क घेतलेल्यांनाही होतोय. त्यामुळे काळजी घेतली तर त्याची तीव्रता करता येईल”, असं राहुल पंडित यांनी सांगितलं.