मुंबई, 11 सप्टेंबर : साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार (Mumbai Sakinaka rape case) होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली असून पोलीस आयुक्तांशी देखील ते बोलले आहेत. झालेली घटना निंदनीय आहे. हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी तातडीने तपासाला गती देण्याचे निर्देश दिल्याचेही सांगितले. गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलं, साकीनाका येथे घडलेल्या बलात्कार प्रकरणात आरोपीला अटक केली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू असून यात जो कुणी सहभागी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. मुख्य आरोपी पकडलाय त्याच्या कडून माहिती काढून घेऊन त्याच्यावर ही कठोर कारवाई केली जाईल. महिलांच्या बाबतीत लवकरच शक्ती ऍक्ट तयार करण्यात येईल, त्याची प्रोसेस सुरू आहे. निर्भयाचा मृत्यू मनाला चटका लावणारा, नराधमांना फाशीच झाली पाहिजे - देवेंद्र फडणवीस राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देत म्हटलं, साकीनाका येथे घडलेला एकूण प्रकार आणि त्यानंतर त्या निर्भयाचा मृत्यू हा मन सुन्न करणारा आहे, चटका लावून जाणारा आहे. गेल्या महिन्याभरात ज्या प्रकारे बलात्काराच्या घटना होत आहेत, कुठेतरी याकडे लक्ष घालण्याच्या आवश्यकता आहे. साकीनाकाचं प्रकरण, अमरावतीत 17 वर्षीय मुलीवर बलात्कार, पुण्यात तीन घटना घडल्या आहेत. पालघरमध्ये घटना घडल्या आहेत अतिशय भयानक अशा या घटना आहेत. माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. सुरक्षित शहर म्हणून मुंबईची ओळख आहे. मुंबईत महिला, मुलींना रात्री फिरण्या करता कधी अडचण येत नाही पण अशा प्रकारच्या घटना घडल्या जर घडल्या तर एकप्रकारे मुंबईच्या लौकिकाला धक्का पोहोचतो.