मुंबई, 7 मे : मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एक मोठी कामगिरी केली आहे. पोलिसांनी रेल्वे लाईनवर तरुणांना ड्रग्स विकणाऱ्या एका बंटी-बबलीच्या (Drug dealer Bunty-Babli) जोडीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी तरुणांना अंमली पदार्थ विकण्याच्या नावाखाली त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करत होते. अखेर पोलिसांनी या बंटी-बबलीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्यावर अंमली पदार्थ खरेदी-विक्री प्रकरणी आधीपासून सात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. विशेष म्हणजे मुंबईत गेल्या अनेक वर्षांपासून हे बंटी-बबली अंमली पदार्थांचा धंदा करत होते. त्यांच्याकडून मुंबई पोलिसांनी 295 ग्रॅम हेरॅाईन जप्त केलंय, ज्याची बाजारातील किंमत ही तब्बल 35 लाख 40 हजार रुपये आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहिसरच्या आंबावाडी परीसरात राहणारे हे बंटी-बबली अंमली पदार्थ खरेदी-विक्रीचा व्यवसाय करायचे. पोलिसांना या बंटी-बबलीच्या अंमली पदार्थांच्या धंद्याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी दहिसर येथील आंबावाडीमधील पुष्प विहार कॉलनी येथे छापा मारुन बाबू मुजावर आणि त्याची पत्नी फरजाना मुजावर या दोघांना ताब्यात घेतले. याचवेळेस या दोघांच्या घरातून पोलिसांनी 35 लाख 40 हजार रुपयाचे 295 ग्रॅम हेरॅाईन जप्त केले. या दोघांवर अंमली पदार्थ कारवाईनुसार कलम 8 क आणि 29 क अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. ( मुलगा समजून झोपलेल्या बापावरच केले कोयत्याने सपासप वार, पुण्यातील धक्कादायक घटना ) दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या दोघांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. तर या दोघांच्या चौकशीत आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे रेल्वे रुळालगत रात्री 11 ते पहाटे 4 वाजेपर्यंत हे दोघे अंमली पदार्थ विक्रीचा धंदा करायचे. रोज हे आपला ठिकाणा बदलत असून त्याकरता विशेष कोडद्वारे ठिकाणांची नावे सांगायची, जेणेकरुन तरुण यांच्याकडे अंमली पदार्थ विकत घ्यायला येतील. तर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार या दोघांवर अंमली पदार्थ खरेदी विक्रीचे आतापर्यंत 7 गुन्हे मुंबईत दाखल आहेत.