मुंबई, 9 एप्रिल : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनद्वारे संवाद साधत MPSC परीक्षांबाबत महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. ‘कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यभरात मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने दोन दिवसांनी होणाऱ्या MPSC परीक्षेबाबत राज्य सरकारने योग्य भूमिका घ्यावी,’ अशी विनंती राज ठाकरे यांनी फोनवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे केली आहे. ‘MPSC ची तयारी करणारे राज्यातील काही विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तसंच परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना इतर जिल्ह्यात जावं लागणार आहे. त्यामुळे वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे भीतीची स्थिती आहे,’ अशी भूमिका राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडली. याबाबत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी माहिती दिली आहे. हेही वाचा - आक्रमक असलेल्या केंद्र सरकारवर पलटवार करण्यासाठी महाविकास आघाडीने साधली संधी! दरम्यान, कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी राज्यभरात निर्बंध लागू केले आहेत. मात्र हा निर्णय घेण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांशी संवाद साधला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंनाही फोन करून सहकार्याचं आवाहन केलं होतं. MPSC परीक्षा पुढे ढकलणार? राज्यातील काही कॅबिनेट मंत्र्यांनी 11 एप्रिल रोजी होणारी MPSC परीक्षा पुढे ढकलावी (MPSC exam postponed) अशी मागणी केली आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. तसंच राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एप्रिल महिन्यामध्ये रुग्णसंख्येचा वाढता आलेख पाहता या महिन्यात होणाऱ्या सर्वच परीक्षा रद्द करून नव्याने नियोजन करावं, अशी मागणी केली आहे.