आज सकाळी शिवाजी पार्कमध्ये अज्ञात लोकांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांना स्टम्पने मारहाण केली होती.
मुंबई, 03 मार्च : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे फायरब्रँड नेते संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळी अज्ञात लोकांनी हल्ला केला होता. त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. खुद्द मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी हिंदुजा रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यानंतर देशपांडे यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज सकाळी शिवाजी पार्कमध्ये अज्ञात लोकांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांना स्टम्पने मारहाण केली. तर हा हल्ला परतवून लावण्याच्या प्रयत्नात संदीप देशपांडे यांच्या हाताला जबर मार लागला. या हल्ल्यानंतर त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर राज ठाकरे, अमित ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन देशपांडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर राज ठाकरे, अमित ठाकरे हे स्वत: देशपांडे यांना घरी सोडण्यासाठी गेले. (आम्हाला कोणी मोठा भाऊ नाही पण तरीही…, पंकजा मुंडे झाल्या भावुक) मिळालेल्या माहितीनुसार, संदीप देशपांडे यांच्यावर पाच अज्ञातांनी हल्ला केला. हल्लेखोर तोंडावर मास्क आणि रुमाल बांधून आले होते. तसेच त्यांच्याकडे हल्ला करण्यासाठी क्रिकेटचे स्टम्प होते. पाळत ठेवून हा हल्ला करण्यात आल्याचे दिसून येते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी संदीप देशपांडे यांनी युवासेना पदाधिकारी वैभव थोरात यांचा महापालिकेतील भ्रष्टाचार बाहेर काढला होता. या प्रकरणात त्यांच्यावर प्रकरण दाबण्यासाठी वारंवार फोन केले जात होते, अशी माहिती मिळाली आहे. (संजय राऊत यांच्यावर शरद पवार नाराज, उद्धव ठाकरेंसमोरच बोलून दाखवलं) संदीप देशपांडे हे एक कट्टर मनसैनिक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेची विद्यार्थी संघटना असलेल्या भारतीय विद्यार्थी सेनेतून झाली. त्यावेळी विद्यार्थी सेनेचं काम राज ठाकरे पाहायचे. त्यांनीच संदीप देशपांडे यांना महाविद्यालयीन निवडणुकीत संधी दिली आणि ते विजयी देखील झाले.