मनसेची थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी
मुंबई, 20 फेब्रुवारी : मागील काही दिवसांपासून मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. सिद्धिविनायक मंदिराबाबत झालेल्या आरोप खोटे आहेत, त्यात काही तथ्यं नाही, असे म्हणत आदेश बांदेकर यांनीही त्यांच्यावर झालेले आरोप फेटाळले आहेत. तसेच आरोप करणारे मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांचा नक्कलधारी असा उल्लेख केला होता. आता पुन्हा एकदा यशवंत किल्लेदार यांनी आदेश बांदेकर यांच्यावर हल्ला करत त्यांची पदावरुन हकालपट्टी करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
काय म्हणाले यशवंत किल्लेदार? आदेश बांदेकर यांची हकालपट्टी करण्याची मागणी मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. “तुम्ही उत्तम काम करत आहात म्हणुन शिवसेना तुमच्याकडे आली. माझी आपल्याला विनंती आहे, तुम्ही सर्वप्रथम सिद्धिविनायक न्यास मंदिर अध्यक्ष आदेश बांदेकर यांची या पदावरुन हकालपट्टी करा. उद्धव ठाकरे यांच्यामुळे बांदेकर न्यास मंदिर अध्यक्ष पदाच्या खुर्चीला चिटकून आहे.” असं ट्विट यशवंत किल्लेदार यांनी केलं आहे. वाचा - ‘मराठा आरक्षणासंदर्भात..’ अशोक चव्हाणांच्या लेटरहेडचा गैरवापर; घातपाताचाही संशय, पोलिसात तक्रार यापूर्वीही आरोप प्रत्यारोप आदेश बांदेकर यांनी सिद्धिविनायक न्यास मंदिरात नियमबाह्य कामं केल्याचा आरोप किल्लेदार यांनी केला होता. दरम्यान आदेश बांदेकर यांनी त्यांच्यावर झालेलं सर्व आरोप फेटाळले होते. याबाबत ते म्हणाले की, माझ्यावर आणि श्री सिद्धिविनायकांवर तथ्यहिन आरोप होत आहेत. यातून जगप्रसिद्ध हिंदू देवस्थानाची बदनामी करण्याचं षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप केला. असे प्रकार म्हणजे प्रसिद्धिसाठी केविलवाणी धडपड आहेत. हे आरोप करणाऱ्या यशवंत किल्लेदार नामक नक्कलधारी वृत्तीला श्री सिद्धिविनायकांनी सुबुद्धि द्यावी हिच प्रार्थना, असे म्हणत अजूनही मी मर्यादा पाळत असल्याचे बांदेकर म्हणाले होते.
दरम्यान आदेश बांदेकर हे देवेंद्र फडणवीस हे माझे मित्र आहेत. त्यामुळे मला क्लीनचिट मिळेल, असे वक्तव्य करीत असल्याचा आरोपही किल्लेदार यांनी केला आहे. यावर किल्लेदार म्हणाले की, फडणवीस यांची जनमाणसात प्रतिमा चांगली आहे. त्यांनी मैत्री बाजूला ठेवून काय असेल ते पाहून कारवाई करावी. त्यांची मैत्री या प्रकरणाच्या आड येणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.