मुंबई, 1 जानेवारी : महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या (Coronavirus in Maharashtra) संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे प्रशासन आणि सरकारकडून कोविड प्रतिंबंधात्मक नियमांचे पालन करण्याच्या सुचना नागरिकांना केल्या जात आहेत. मात्र, असे असतानाच राजकीय नेते (Politicians) मंडळी मात्र या नियमांकडे सर्रास दुर्लक्ष करुन नियम पायदळी तुडवत आहेत. गेल्या काही दिवसांत राजकीय नेते, आमदार हे विविध लग्नसमारंभात सहभागी होताना दिसले. या लग्नसमारंभात मोठी गर्दी झाल्याचंही दिसून आलं आणि हीच गर्दी कोरोनाची सुपरस्प्रेडर ठरल्याचं दिसत आहे. जर राजकीय नेते आणि मंत्री महोदय नियमांकडे दुर्लक्ष करत असतील तर सर्वसामान्य नागरिकांकडून नियमांचे पालन कसे होणार असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मुलीचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. त्यानंतर 30 डिसेंबर रोजी हर्षवर्धन पाटील यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यांनी ट्विट करत या संदर्भात माहिती दिली होती.
वाचा : “मुंबई-पुण्याची स्थिती तीन दिवसांत वेगाने बिघडलीय, स्थिती आणखी बिघडली तर कठोर निर्णय घ्यावा लागेल” : अजित पवार हर्षवर्धन पाटील यांच्या मुलीचा विवाह बिंदुमाधव ठाकरे यांचायम मुलासोबत झाला. त्यामुळे या लग्नसोहळ्यात राजकीय नेत्यांसोबत इतरही व्हीआयपींनी उपस्थिती लावली होती. या लग्नात खासदार सुप्रिया सुळे, बाळासाहेब थोरात हे सुद्धा उपस्थित होते.
सुप्रिया सुळेंना कोरोना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वत: ट्विट करुन या संदर्भात माहिती दिली आहे.
आपल्या ट्विटमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं, “मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी, ही नम्र विनंती. काळजी घ्या.” वाचा : Corona ची तिसरी लाट? राज्यात या महिन्यात रुग्णसंख्या 2 लाख तर 80 हजार मृत्यू होण्याची भीती राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनाही कोरनाचा संसर्ग झाला आहे. 30 डिसेंबर रोजी त्यांनी ट्विट करुन या संदर्भात माहिती दिली.
विखे पाटलांना कोरोना भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा मुलगा अक्षय कर्डिले याचा विवाह मोठ्या थाटात पार पडला आहे. या लग्नात हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यांच्यासह विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन तसेच जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राम शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. या लग्नसोहळ्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं. या लग्नसोहळ्यात नेते विनामास्क वावरत असल्याचं दिसून आलं.
बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड , ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांना कोरोनाची लागण झाली आहे.
राज्यातील 10 मंत्री आणि 20 आमदार कोरोना बाधित उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं, काळजी घ्या कोरोनामुळे स्थिती फार वेगाने खराब होतेय. राज्याचे 10 मंत्री आणि 20 पेक्षा जास्त नेते कोरोना बाधित आहेत. सगळ्यांना नियम पाळावे लागतात स्थिती जर आणखी बिघडली तर कठोर निर्णय घ्यावा लागेल. काल मुख्यमंत्र्यांनी तीन तास टास्कफोर्ससोबत बैठक घेतली. मुंबई, पुण्याची स्थिती तीन दिवसांत वेगाने बिघडली आहे. शर्यती, सार्वजनिक कार्यक्रम करू नका, गर्दी करू नका. मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय महत्वाचे आहेत राज्यात सगळ्यांनी त्याची अंमलबजावणी करा.