मुंबई, 07 नोव्हेंबर: अरबी समुद्रात (Arabian Sea) निर्माण झालेलं हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र (Low pressure area) पुढील 12 तासांत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज आणि उद्या अरबी समुद्रात वादळी वारे (Gusty wind) वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांना मासेमारी करण्यासाठी समुद्रात न जाण्याचा सल्ला हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आला आहे. असं असलं तरी सुदैवाची बाब म्हणजे, अरबी समुद्रात निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र भारतीय किनारपट्टीपासून दूर जात आहे. याचा महाराष्ट्राला कोणताही धोका नाही. पण आज काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी बरसणार आहेत. पूर्व-मध्य अरबी समुद्रात निर्माण झालेलं हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र पुढील 12 तासांत आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आज अरबी समुद्रात 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तर उद्या वाऱ्यांचा वेग काहीसां मंदावणार असून उद्या 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार आहे. पुढील 48 तासात अरबी समुद्रात हवामाची हीच स्थिती कायम राहणार आहे. त्यानंतर हवेच्या कमी दाबाचा प्रभाव हळुहळू कमी होण्याची शक्यता आहे. हेही वाचा- सावधान! माणसांपाठोपाठ आता पाळीव प्राण्यांमध्ये आढळला कोरोनाचा ‘अल्फा’ व्हेरिएंट हवेच्या कमी दाबाचं हे क्षेत्र सध्या मुंबईपासून दक्षिण-पश्चिमेला 800 किमी अंतरावर आहे. तर हवेच्या कमी दाबाचं हे क्षेत्र पणजीपासून पश्चिम नैऋत्य दिशेला 700 किमी अंतरावर आहे. सध्या हे क्षेत्र भारतीय किनारपट्टीपासून दूर जात आहे. तसेच पुढील 48 तासात याची तीव्रता कमी होणार आहे. त्यामुळे भारतीय भूमीत याचा फटका बसणार नसला, तरी अरबी समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाणाऱ्या मच्छिमारांना हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
दुसरीकडे, आज महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, रायगड आणि पुणे या जिल्ह्यांत ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. आज सकाळपासूनच याठिकाणी ढगाळ हवामान असून पुढील काही तासांत संबंधित जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र आजपासून पुढील पाच दिवस कोरड्या हवामानाची शक्यता आहे.