मुंबई, 28 फेब्रुवारी : महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरात आता वेगाने गाड्या चालवणाऱ्यांना ब्रेक लागणार आहे. मुंबईत आता ७० किलोमीटर प्रती तासाच्या वर गाडी चालवल्यास तुम्हाला वाहतूक पोलिसांचे इ चलना मार्फत दंड भरावा लागू शकतो. कारण, आता मुंबईत वाहनांची वेग मर्यादा ही प्रती तास ७० किमी करण्यात आली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी याबद्दल जारी केलेल्या आदेशानुसार हे निर्बंध घालण्यात आले आहे. यामुळे जर आता तुम्ही मुंबईत गाडी चालवणार असाल तर सावधान आपल्या वेगाला मर्यादा घाला नाहीतर मुंबई वाहतूक पोलीस तुम्हाला दंडाच्या रक्कमांची माळ घालतील. तुम्हाला वाटत असेल की, आपल्या कोण पाहतंय तर तुमचा समज चुकीचा आहे. कारण, जवळपास ९० टक्के मुंबई पुर्णता: सीसीटीव्ही कॅमेऱ्याने सज्ज आहे. त्यामुळे तुमची एक चुक तुमच्या खिशाला भारी पडू शकते. या सीसीटीव्हीच्या आधारे तुम्हाला दंडाची पावती घरपोच पाठवण्याची व्यवस्था पोलिसांनी करून ठेवली आहे. असे असेल मुंबईत वेग मर्यादा निर्बंध? - संपुर्ण मुंबईत वेगमर्यादा प्रती तास ७० किमी वेग मर्यादा - मरीन ड्राईव्ह प्रती तास ६५ किमी वेग मर्यादा - वरळी सी लिंक प्रती तास ८० किमी वेग मर्यादा आणि वळणावर प्रती तास ३५ ते ४० किमी वेग मर्यादा - पुर्व, पश्चिम, सायन पनवेल, एससीएलआर या चारही मार्गावर प्रती तास ७० किमी वेग मर्यादा असेल - जे जे उड्डाण पुल प्रती तास ६० किमी वेग मर्यादा तर वळणावर प्रती तास ४० किमी वेग मर्यादा - इस्टर्न फ्री वे वर प्रती तास ८० किमी वेग मर्यादा तर वळणावर ४० किमी प्रती तास वेग मर्यादा - लालबाग उड्डाण पूल, जग्गनाथ शंकर शेठ उड्डाणपूल, नाना लाल मेहता उड्डाण पुल या तीनही उड्डाण पुलांवर वेग मर्यादा प्रती तास ७० किमी असेल एकीकडे मुंबईत वाढती वाहतूक कोंडी आणि रॅश ड्रायव्हिंगच्या घटनासमोर आल्यामुळे वाहतुकीच्या नियमात हे बदल करण्यात आले आहे. 1 मेपासून पूर्णपणे प्लास्टिक बंदी, आदित्य ठाकरेंचा महत्त्वपूर्ण निर्णय दरम्यान, राज्यात येत्या 1 मेपासून सिंगल युज डिस्पोजेबल म्हणजेच एकदाच वापरले जाणारे प्लास्टिक पूर्णपणे बंद करण्यात येईल, अशी घोषणा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली. राज्यात प्लास्टिक बंदी असूनही काही भागात प्लास्टिक पिशव्यांची देवाणघेवाण सर्रास सुरू आहे. या संदर्भात काँग्रेसचे आमदार रामहरी रुपनवर यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिले. प्लास्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून महिला बचत गटांच्या माध्यमातून कापडी पिशव्या उत्पादित केल्या जात आहेत. या बंदीतून प्लास्टिक बाटल्या वगळण्यात आल्या आहेत, अशीही माहिती आदित्य ठाकरे यांनी सभागृहात केली. प्लास्टिक बंदी एक लोक चळवळ व्हायला हवी. लोकांच्या सहभागाशिवाय प्लास्टिक बंदी यशस्वी होणार नाही. यासाठी लोकांनी प्लास्टिक वापरण्याची सवय आणि सोय बदलली पाहिजे, असेही मत आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर लगेचच बंदी आणता येणार नाही, हा मुद्दा धार्मिक भावनेशी निगडीत आहे, असे आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केले आवाहन… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी एकदा वापरात येणाऱ्या प्लास्टिक बंदीचा वापर टाळण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, केंद्र सरकारने 2 ऑक्टोबरपासून देशभरात प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे. या संदर्भात सर्व राज्य सरकारांना आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक सूचनाही केंद्र सरकरने जारी केल्या आहेत. महात्मा गांधी यांच्या जयंतीपूर्वी प्लास्टिक बॅग, प्लास्टिक कटलरी आणि थर्माकॉलपासून तयार होणारी कटलरी बंद करण्याचा सरकारचा मानस असून यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत एकदा वापरण्यात येणारे प्लास्टिक पूर्णपणे बंद करण्यात येईल, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.