(मुंबईसह राज्यात पावासाचा हाहाकार)
मुंबई, 19 जुलै : मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, रत्नागिरी, खेडसह सर्वदूर पावसाने धुमशान घातले आहे. ठाण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अंबरनाथ ते कर्जतपर्यंत लोकल सेवा ठप्प झाली. अजूनही कल्याणपर्यंत लोकल सेवा रखडलेली आहे. याच दरम्यान, रेल्वेतून खाली उतरत असताना एका महिलेचं 4 महिन्याचं बाळ हातातून निसटलं आणि पाण्यात वाहून गेलं. तर दुसरीकडे खेडमध्ये पावसाने हाहाकार माजवला असून अनेकांचे संसार पाण्याखाली गेले आहे. गेल्या दोन दिवसापासून राज्यात पावसाने सर्वदूर दमदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी नद्या आणि नाल्यांना पूर आला आहे. अशातच आज 19 ते 21 जुलैपर्यंत अनेक जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज सकाळपासून मुंबईसह ठाणे आणि उपनगरात तुफान पाऊस झाला. अंबरनाथमध्ये रेल्वे स्ठानकावर पाणी जमा झालं त्यामुळे वाहतूक ठप्प झाली. दुपारच्या नंतर ट्रॅकखालील खडीच वाहून गेल्याचं समोर आलं. त्यामुळे वाहतूक पुर्ववत होण्याचे चिन्ह आता धुसर झाले आहे.
अशातच अंबरनाथ लोकल वाहतूक ठप्प झाली असतानाच एक हृदय हेलावून टाकणारी घटना घडली आहे. अंबरनाथ लोकल उभा राहिली असताना काही प्रवाशी लोकलमधून चालत ट्रॅकच्या बाजूने जात होते. तेव्हा एका महिलेसोबत असलेल्या पुरुषाच्या हातात असलेलं चार महिन्यांचं बाळ पाण्यात पडल्यानंतर वाहून गेलं आहे. यावेळी बाळाच्या आईचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.
मुंबईसह उपनगरांमध्ये धुवाधार पाऊस पडत आहे, यामुळे मुंबईची लाईफलाईन विस्कळीत झाली आहे. सततच्या पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे. त्यामुळे सीएसएमटीहून डाऊन दिशेकडे जाणारी आणि अप दिशेकडे येणाऱ्या सर्व लोकल रेल्वे वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत डोंबिवली रेल्वे स्थानकापर्यंत चालविण्यात येत आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.
तर खालापूर, पेण, पनवेल तालुक्याच्या सीमेवर असलेल्या आपटा गावालगत जाणाऱ्या पातळगंगा नदीला पूर आल्याने संपूर्ण गाव पाण्याखाली गेलं आहे. पाण्यात अर्धवट बुडालेला गणपती मंदिरात ग्रामस्थांनी छातीभर पाण्यात उभे राहून गणपतीची आरती केली.