छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या विधानावर वाद झाल्याच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच राज्यपाल कोश्यारी यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
मुंबई, 12 डिसेंबर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. अखेरीस राज्यपालांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. याबद्दल भाजपचे नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून ‘महापुरुषांच्या अनादराची स्वप्नातही कल्पना करू शकत नाही. वर्तमानातील कर्तव्यशील व्यक्तींचा आदर्श सांगणे म्हणजे महापुरुषांचा अपमान नव्हे’ असं राज्यपाल या पत्रात म्हणाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या विधानावर वाद झाल्याच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच राज्यपाल कोश्यारी यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. आपल्या विधानाबाबतची वस्तुस्थिती स्पष्ट केली असून अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. यावेळी त्यांनी शिवनेरी, सिंहगड, रायगड, प्रतापगड, सिंदखेडराजासारख्या पवित्र स्थळांवरील प्रवासाचा दाखला दिला आहे. या पत्रात काय म्हणतात राज्यपाल? माझ्या भाषणातील एक छोटा अंश काढून काही लोकांनी भांडवल केले. मी म्हणालो की, मी शिकत होतो तेव्हा महात्मा गांधीजी, पंडित नेहरुजी, नेताजी सुभाषचंद्र बोस इत्यादींना विद्यार्थी आदर्श मानत. हे सारे आदर्श आहेत. पण, युवापिढी वर्तमान पिढीतील आदर्श सुद्धा शोधत असतेच. त्यामुळेच मी असे म्हणालो की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून ते अगदी अलिकडच्या काळातील नितीन गडकरी हेही आदर्श असू शकतात. याचाच अर्थ डॉ. एपीजे अब्दुल कलाम, होमी भाभा या सुद्धा अनेक कर्तव्यशील व्यक्तींचा युवा पिढीला आदर्श राहू शकतो. (Anil Deshmukh : 100 कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांना जेल की बेल? आज महत्त्वाचा फैसला) आज संपूर्ण जगात भारताचा लौकिक वाढविणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुद्धा आदर्श विद्यार्थ्यांसमोर राहू शकतो, याचा अर्थ महापुरुषांचा अवमान करणे असा तर होत नाही. येथे कुठेही तुलना करणे हा विषयच असू शकत नाही. आता जेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय आहे, ते केवळ महाराष्ट्राचे नाही, तर संपूर्ण देशाचे गौरव आहेत. कोरोनाच्या काळात, जेथे अनेक ‘महनीय’ आपल्या घरातून बाहेर निघत नव्हते, तेव्हा मी या वयात सुद्धा शिवनेरी, सिंहगड, रायगड, प्रतापगडासारख्या पवित्र स्थळांवर पायी जाऊन दर्शन घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या शूर पुत्राला जन्म देणार्या वंदनीय माँ जिजाऊ यांच्या जन्मस्थळी सिंदखेडराजा येथेही गेलो. गेल्या 30 वर्षांत त्याठिकाणी जाणारा मी पहिला राज्यपाल असेन. तेथे मी हवाई मार्गाने नाही, तर मोटारीने गेलो. माझ्या कथनाचा मतितार्थच हा होता की, छत्रपती शिवाजी महाराज हे सदासर्वकाळासाठी प्रेरणास्त्रोत आहेत. (शाईफेकीचं समर्थन नाही, मात्र चंद्रकांतदादांना… खडसेंनी पुन्हा डिवचलं) आदरणीय अमितजी, आपण जाणताच की, 2016 मध्ये जेव्हा आपण हलदानी येथे होतात, तेव्हाच 2019 पासून कोणतीही निवडणूक लढणार नाही किंवा राजकीय पदांपासून दूर राहीन, अशी माझी इच्छा प्रदर्शित केली होती. परंतू मा. पंतप्रधान आणि आपल्यासारख्यांचा माझ्यावरील स्नेह आणि विश्वास पाहून मी महाराष्ट्रासारख्या महान राज्याचे राज्यपालपद स्वीकारले. माझ्याकडून कधी अनावधानाने चूक झालीच, तर तत्काळ खेद व्यक्त करणे किंवा क्षमायाचना करण्यास मी कधीच संकोच करीत नाही. मुगल काळात साहस, त्याग आणि बलिदानाचे मूर्तिमंत असलेल्या महाराणा प्रताप, गुरू गोविंदसिंहजी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या वंदनीय महापुरुषांबाबत अपमानाची तर मी स्वप्नातही कल्पना करू शकत नाही, असं राज्यपाल या पत्रात म्हणाले आहे.