मुंबई, 4 जून : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे संकट उभे ठाकले आहे. कोरोनाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे. तर राज्यात एकूण चाचण्यांची संख्या कायम ठेवताना मुंबईतील चाचण्यांची संख्या मात्र 50 टक्क्यांहून अधिक संख्येने कमी करण्यात आल्या आहेत आणि आता राज्यात कोरोनाबळींची संख्या झपाट्याने वाढत आहे, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. 1 मे 2020 रोजी महाराष्ट्रातील एकूण चाचण्यांमध्ये मुंबईतील चाचण्यांचे प्रमाण हे 56 टक्के होते. त्यानंतर 5 मे 2020 रोजी हे प्रमाण 40.5 टक्क्यांवर आणण्यात आले आणि आता 31 मे 2020 रोजीची आकडेवारी पाहिली तर एकूण महाराष्ट्रातील चाचण्यांच्या तुलनेत मुंबईतील चाचण्यांचे प्रमाण हे 27 टक्क्यांवर आले आहे. कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या मुंबईत चाचण्यांची कमी होणारी संख्या ही निश्चितच चिंताजनक बाब आहे, असं फडणवीस यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. हेही वाचा - ..आणि आशिष शेलारांनी मानले संजय राऊतांनी आभार, आठवण करून दिली ‘हीच ती वेळ’ ‘राज्यात कोरोनाबळींच्या संख्येने नवीन उच्चांक गाठले जात आहेत. 27 मे 2020 रोजी 105 बळींची नोंद झाली होती. 29 मे 2020 रोजी ही संख्या 116 वर पोहोचली आणि आता 3 जून 2020 रोजी तर 122 बळी असा नवीन उच्चांक स्थापित झाला. मुंबईच्या बाबतीत विचार केला तर आतापर्यंतचे सर्वाधिक 64 बळी 30 मे रोजी गेले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून प्रत्येकी 49 बळी एकट्या मुंबईत आहेत’ असा दावा फडणवीस यांनी केला. दुसरीकडे अनेकांच्या मृत्यू प्रमाणपत्रातून ‘कोरोना’ किंवा ‘कोरोना संशयित’ हा शब्द वगळण्यात आल्याचे सुद्धा अनेक प्रकार उघडकीस येत आहेत, असा आरोपही फडणवीसांनी केला. हेही वाचा - महाराष्ट्राच्या लॉकडाऊन नियमावलीत पुन्हा बदल; असे आहेत नवे नियम मुंबईमध्ये चाचण्या वाढविण्याचा आग्रह असण्याचे आणखी एक कारण म्हणजे, 1 मे ते 24 मे दरम्यान झालेल्या चाचण्यांमध्ये पात्र नमुन्यांपैकी युनिक पॉझिटिव्ह नमुने 32 टक्के तर 31 मे रोजी ते जवळपास 31 टक्के आहे. जेव्हा संक्रमणाचा दर इतका अधिक असतो, तेव्हा नमूने तपासणी पूर्वीपेक्षा किमान दोन पटींनी वाढविणे आवश्यक असते. येथे मात्र ते 50 टक्क्यांहून अधिक प्रमाणात कमी करण्यात आले आहेत. मात्र, 10 हजार चाचण्यांची क्षमता असताना केवळ 3500 ते 4000 चाचण्याच केवळ मुंबईत होत आहेत. कोरोना रूग्णांची आकडेवाडी कमी-अधिक दाखवून फायदा नाही, तर कोरोना प्रादुर्भावाला अटकाव आवश्यक आहे, अशी मागणीही देवेंद्र फडणवीस यांनी केली.