मुंबई, 28 जुलै: एकाच दिवशी देशात 80 लाखाहून अधिक लोकांचं लसीकरण (Vaccination) केल्यानंतर, महाराष्ट्रासह देशात लसीकरणाचा वेग मंदावला आहे. एकीकडे सर्वांसाठी मोफत लशीची (Free Vaccination) घोषणा करण्यात आली आहे. पण वास्तविक चित्र मात्र वेगळंच आहे. लशीच्या एका डोससाठी लोकांना आठ-आठ दिवस लसीकरण केंद्रावर हेलपाटे मारावे लागत आहेत. विशेष म्हणजे आठ दिवस हेलपाटे मारूनही अनेकांना लस मिळत नाही. याचा प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. वयोवृद्ध लोकांना लस घेण्यासाठी किती त्रास होतं आहे, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral video) होतं आहे. मुंबई न्युज नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला असून यामध्ये एका तरुणानं वृद्धांची व्यथा मांडली आहे. हा व्हिडीओ मुंबई महानगर पालिकेच्या हद्दीतील कुर्ला भाभा हॉस्पिटलचा आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून नागरिक याठिकाणी लस घेण्यासाठी येत आहेत. पण प्रत्येक वेळी त्यांच्या हाती निराशा येत आहे. आल्यापावली त्यांना परत जावं लागत आहे. हेही वाचा- देशात तिसऱ्या लाटेचे संकेत? या दोन गोष्टींनी वाढवली चिंता आरोग्य कर्मचारी सकाळी आठ वाजता रुग्णालयाच्या गेटवर लसीकरण नसल्याचं बोर्ड लावून निघून जातात. पण लस घेण्यासाठी नागरिक मध्य रात्री 1 वाजल्यापासून रुग्णालयाबाहेर रांगा लावत आहेत. पण तरीही त्यांना लस मिळत नाहीये. रात्री 1 पासून सकाळी 10 वाजेपर्यंत या वृद्धांना रुग्णालयाबाहेर ताटकळत उभं राहावं लागत आहे. याठिकाणी त्यांच्या जेवणाचा किंवा चहाची काही सुविधा नाही. त्यामुळे 8-8 तास त्यांना उपाशीपोटी रांगेत उभं राहावं लागत आहे.
हेही वाचा- धक्कादायक! मुंबईतील डॉक्टर तरुणीला तीनदा कोरोनाने गाठलं; लसीकरणानंतरही संसर्ग लसीकरणासाठी आलेले नागरिक लशीसाठी रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. त्यामुळे याठिकाणी कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता देखील अधिक आहे. अशा स्थितीत केंद्र सरकारकडून लशीचा पुरवठा वाढवणं गरजेचं आहे. लोकांना वेळेवर लस मिळाली, तर लसीकरण केंद्राबाहेर होणारी गर्दी टळू शकते.