मुंबई, 1 जून : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे महाविद्यालयीन अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्याचे उच्चशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाची माहिती देत विद्यार्थ्यांना भावनिक पत्र लिहिले आहे. ‘आमच्यातील पालक जिवंत आहे. कोरानाचा संसर्ग सुरू असताना अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊ शकत नाही. सर्व सत्र परीक्षांचे सरासरी गुण देऊन विद्यार्थ्यांना पास करण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांना इच्छा आहे परीक्षा देण्याची त्यांना सर्व सुरळीत झाल्यावर तशी व्यवस्था करण्यात येईल’ अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली होती. या घोषणेनंतर आज उच्चशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विद्यार्थ्यांसाठी एका पत्र लिहिले आहे. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतिम परीक्षांबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला आणि मीच परीक्षा पास झालो की काय अशी भावना मला आली. खरंच लॉकडाउन सुरू झाल्यापासूनचा काळ मला माझ्या अंतिम वर्षाच्या परीक्षेसारखा वाटला. तेच टेन्शन तीच गडबड, तेच प्रेशर मला जाणवलं. कोणी शहरात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी गावी गेले होते, कोणी कोरोनाच्या भीतीने परीक्षा केंद्रात जायला घाबरत होते, अभ्यासू विद्यार्थी परीक्षेसाठी तयार होते, कोणी परीक्षेबाबत पसरलेल्या अफवांना बळी पडत होते. भीती सारखी असली तरी प्रत्येकाच्या मनातील संभ्रम वेगळा होता’ असं तनपुरे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
‘या काळात सुवर्णमध्य गाठणं दिवसेंदिवस कठीण होत होतं. मानसिकरित्या, आरोग्याच्यादृष्टीने तुम्हाला कसलीच अडचण येऊ नये ही हुरहूर कायम मनात होती. त्यात तुमच्या भविष्याची चिंता अधिक तीव्रतेने जाणवत होती. त्या सर्व गोष्टींचा सारासार विचार करत आम्ही निर्णय घेतला. आता तुम्हाला सरासरी मार्क्स मिळतील’ अशी माहिती तनपुरे यांनी दिली. हेही वाचा - …मनावर दगड ठेवून निर्णय घ्यावा लागला, पंकजा मुंडेंची भावनिक पोस्ट! तसंच, ‘या निर्णयामुळे माझे काही मित्र दुखावलेही जातील. मात्र आपण त्यावरही मार्ग काढू. या कागदावरच्या परीक्षा होत राहतील, मात्र खरी परीक्षा काय असते ते आपल्याला जीवनात येणारे चढउतार शिकवत असतात. आता त्याच एका नैसर्गिक आपत्तीच्या परीक्षेतून आपण जात आहोत. ही परीक्षा खूप अवघड आहे पण कठीण नाही. पुढे येणाऱ्या सर्व संकटांना खंबीरपणे सामोरे जाण्याचा धडा आपल्याला यातून मिळणार आहे. चला तर मग धैर्याने, एकीने आणि सकारात्मकतेने आपण पुढे जाऊयात’ असं आवाहनही त्यांनी केलं. संपादन - सचिन साळवे