मुंबई, 01 मे : कोरोनाचा संसर्ग आणि या व्हायरसचा नाश करण्यासाठी देण्यात आलेल्या प्लाझ्मा थेरेपीचा पहिला प्रयोग केलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील लीलावती रुग्णालयात 53 वर्षीय या रुग्णावर पहिल्यांदा प्लाझ्मा थेरेपीचा प्रयोग करण्यात आला होता. त्यानंतर त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. मात्र गुरुवारी या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सर्दी, ताप आणि फुफ्फुसाचा संसर्ग झाल्यानं 25 या व्यक्तीला लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. रुग्णाला कोरोनामुळे न्यूमोनिया झाला आणि प्रकृती अधिकच खालावली. इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) कडून परवानगी मिळाल्यानंतर मुंबईत पहिल्यांदा या रुग्णावर प्लाझ्मा थेरेपीचा प्रयोग करण्यात आला होता. हे वाचा- कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या BMC योद्धांसाठी महापौर किशोरी पेडणेकरांचा मोठा निर्णय परवानगी नंतर या रुग्णावर नायर रुग्णालयातून कोरोनााचा संसर्ग होऊन बरे झालेल्या रुग्णांमधून दान केलेले प्लाझ्मा या व्यक्तीला शनिवारी देण्यात आला होता. रुग्णालयाचे CEO डॉ. व्ही. रविशंकर यांनी सांगितले की रुग्णाला 200 एमएल प्लाझ्मा देण्यात आला होता. त्याला पुढील प्लाझ्मा देण्यात येणार होता, त्यानंतर त्याची प्रकृती अधिक खालावल्याने हे करता आले नाही. या थेरेपीनंतर 4 दिवसांनी या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रुग्णाच्या मृत्यूनंतर प्लाझ्मा थेरेपीबाबतही आता शंका उपस्थित केल्या जात आहेत. प्लाझ्मा थेरेपी हा प्रमाणित उपचार नाही, त्यामुळे सध्या तरी हा केवळ प्रयोग आहे. तो किती यशस्वी होतो हे पाहाणं महत्त्वाचं आहे. मुंबईत काय आहे कोरोनाची स्थिती मुंबईसह उपनगरांमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 7 हजार 69 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत मुंबईत 290 रुग्णांचा व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 10 हजारवर पोहोचला असून एकट्या मुंबईतच 7 हजार रुग्ण आढळल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. हे वाचा- लॉकडाऊनमध्ये अडकलेले आपापल्या घरी जायला उतावीळ… पण अशी असेल प्रक्रिया संकलन, संपादन- क्रांती कानेटकर