फाईल फोटो
मुंबई, 26 जुलै : नागपूरमध्ये प्रशासकीय अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांमध्ये सतत संघर्ष होत आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे नेते हे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्यावर सतत आरोप करत आहेत. या संघर्षात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीही उडी घेतल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची काय भूमिका आहे, असा प्रश्न विचारला जात होता. याबाबत आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उत्तर दिलं आहे. ‘नागपूरचे उदाहरण आहे. तिथे तुकाराम मुंढे महापालिकेचे आयुक्त आहेत. त्यांच्यात आणि नगरसेवकांमध्ये वाद सुरू आहेत. इतकेच काय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशीही त्यांनी पंगा घेतलाय,’ असं म्हणत मुलाखतीदरम्यान संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही तुकाराम मुंढेंच्या मागे आहात की त्या लोकनियुक्त महापालिकेच्या, जी मुंढे यांच्या मागे लागलीय हात धुऊन? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारला. ‘मला असं वाटतं की, तुकाराम मुंढे आल्यापासून तिथे शिस्त लागली आहे. मग मी कोणाच्या मागे उभं राहिलं पाहिजे…मी शिस्तीच्याच मागे उभा आहे,’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी तुकाराम मुंढेंची पाठराखण केली आहे. तुकाराम मुंढेंच्या कठोरपणाबद्दल काय म्हणाले उद्धव ठाकरे? ‘कठोरपणाचा तुम्ही लोकांच्या हितासाठी उपयोग करून घेत असाल तर वाईट काय? त्या वेळी त्यांनी काही नियम, काही कायदे कडकपणाने अमलात आणवले हे काही जणांना परवडत नसेल. पण तुकाराम मुंढेंनी एखादी गोष्ट कडकपणाने अमलात आणली तर अशा अधिकाऱयाच्या पाठी सर्वांनी उभं राहायला पाहिजे. आततायीपणा कोणीच करू नये, शिस्त लावली जात असेल आणि जनतेचं हित जोपासलं जात असेल तर चांगलं आहे. शेवटी जनतासुद्धा उघडय़ा डोळय़ांनी हे बघत असेल. त्यांच्या तोंडावर मास्क असला तरी जनतेचे डोळे उघडे आहेत हे विसरून चालणार नाही. म्हणून मी मागेसुद्धा म्हटले होते की, हा महाराष्ट्र आहे, त्याचा धृतराष्ट्र अजून झालेला नाही आणि होऊ शकत नाही,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.