मुंबई, 8 मार्च : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधीमंडळात आज राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2021) सादर केला. कोरोना काळातील आव्हानात्मक स्थितीतही सर्वसामान्यांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला आहे, तर या अर्थसंकल्पातून राज्यातील जनतेची निराशा झाल्याचा आरोप विरोधी पक्ष असलेल्या भाजपने (BJP) केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समोर येत अर्थसंकल्पाची पाठराखण करत जोरदार फटकेबाजी केली आहे. ‘कोरोनामुळे आव्हानात्मक परिस्थिती होती. पण रडगाणं न गाता सर्व घटकांना दिलासा देणारा, राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प आम्ही मांडला आहे. या अर्थसंकल्पाबाबत मी अजित पवार यांचं अभिनंदन करतो,’ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. दुसरीकडे, अजित पवार यांनी अर्थसंकल्पावर टीकेला उत्तर देत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. ‘महिला दिनाच्या कोरड्या शुभेच्छा नाही दिल्या, तर महिलांना स्वाभिमानाने उभं करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक जण आपल्या चष्म्यातून अर्थसंकल्प पाहणार आहे. मात्र अर्थसंकल्प मांडणी आम्हाला नवी नाही. केंद्राने आमचे 32 हजार कोटी रुपये दिलेले नाहीत. मार्च महिना शिल्लक आहे, त्यामुळे आम्हाला हा निधी मिळेल अशी अपेक्षा आहे,’ असं म्हणत अजित पवार यांनी केंद्राकडे बोट दाखवत भाजप नेत्यांना फटकारलं आहे. अजित पवार नक्की काय म्हणाले? जाणून घ्या ठळक मुद्दे: - राज्यात 48 टक्के असलेल्या महिलांचा विकासात सहभाग मोठा - महाराष्ट्र कधी संकटापुढे झुकला नाही, हटला नाही - अठरापगड जातीच्या एकतेतून माझ्या राजाने स्वराज्य उभे केले - संत तुकारामांचा सिद्धांत डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडी काम करत आहे - कोरोना लढाईत सहभागी झालेल्या योद्धांना अभिवादन, मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रध्दांजली - आरोग्यसाठी 7 हजार 500 कोटीचा प्रकल्प - दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी म्हणून नागरी आरोग्य कार्यालयाची निर्मिती, त्या आधारे शहरात दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देता येतील, त्यासाठी 5 वर्षात 5 हजार कोटी, यावर्षी 800 कोटी - 8 मध्यवर्ती ठिकाणी कार्डियाक कॅथलॅब - नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे - केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्याविरुद्ध 100 दिवस शेतकरी आंदोलन करत आहेत - शेतकऱ्यांच्या पाठिशी आम्ही आहोत. - कठीण काळात कृषी क्षेत्राने राज्याच्या अर्थव्यवस्थेला तारले - शेतकर्यांला योग्य भाव मिळावा असा आमचा प्रयत्न आहे - 31 लाख 23 हजार शेतकर्यांना 19 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली - पीककर्जावरील व्याजाच्या जाचातून शेतकरी सुटका व्हावी म्हणून 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेणार्या शेतकर्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज दिलं जाणार