पीडित मुलीला घरी ठेवून चित्रा वाघ यांनी भाजप आमदाराला ब्लॅकमेल केलं?
मुंबई, 14 ऑक्टोबर : भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीवरुन सकाळी एक ट्विट केलं. शुर्पणखा (Shurpnakha) आणि रावण असा उल्लेख करुन केलेल्या या ट्विटनंतर विविध राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या. चित्रा वाघ यांनी केलेल्या ट्विटनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांनी गंभीर आरोप केला आहे. पीडित महिलेला आपल्या घरी ठेवून भाजप आमदाराला चित्रा वाघ यांनी ब्लॅकमेल केल्याचं विद्या चव्हाण यांनी म्हटलं. विद्या चव्हाण यांनी केलेल्या या विधानावर चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Chitra Wagh blackmailed BJP MLA said Vidya Chavan) विद्या चव्हाण यांना आव्हान चित्रा वाघ म्हणाल्या, कदाचित त्यांच्या कौटुंबिक वादामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्या चव्हाण यांनी आता हे सिद्ध करुन दाखवावं की कुठल्या मुलीला मी घरी ठेवून कुठल्या आमदाराकडून खंडणी मागितली होती. विद्याताईंच्या या वाक्याचा मी निषेध करते, त्यांनी सिद्ध करावं. मी त्याक्षणी राजकारणातून बाहेर पडेल. वाचा : राज्य महिला आयोग अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका : चित्रा वाघ यांचं खळबळजनक ट्विट मला अजित पवार, सुनिल तटकरे आणि शरद पवारांना सांगायचं आहे की, विद्या चव्हाणांना बोलावून घ्या. ही केस आपल्याला माहिती आहे आणि त्याबद्दल काय करायचं? पुढील स्ट्रॅटेजी काय करायची? त्या मुलीला न्याय कसा द्यायचा याच्याबद्दलची स्ट्रॅटेजी आम्हीच एकत्र बसून ठरवली होती. त्यामुळे विद्या ताईंना बोलावून घ्या आणि या केसवर आपण कसं काम केलं हे सांगण्याची गरज आहे असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. विद्या ताईंना माझा इशारा - चित्रा वाघ माझ्या वैयक्तीक आयुष्यावर टीका करुन झाली. आणखीन तुम्हाला काही हौस भागवायची असेल तर भागवा. पण माझ्या कामावर जर कुणी प्रश्नचिन्ह उपस्थित केले तर चित्रा वाघ कधीही खपवून घेणार नाही विद्या ताईंना हा माझा इशारा आहे. कोणी केलं? कुणी खंडणी मागितली? कुठला आमदार घेऊन या त्याला नाही थोबाड फोडलं तुमच्यासमोर तर नाव चित्रा वाघ सांगणार नाही असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. महिला आयोगावर कुणाची नियुक्ती झालीय हे मला माहित नाही. नवरात्रीच्या दिवसांत सुद्धा रावण फिरत आहेत. मला या गोष्टीचं आश्चर्य वाटत मी एका ठराविक व्यक्तीचं नाव घेतलं नाहीये. त्या शूर्पणखा आहेत का? मी इतकंच म्हटलं होतं की त्या पदावर जी व्यक्ती बसेल तिने शूर्पणखेच्या भूमिकेत जाऊ नये आणि रावणाला साथ देऊ नये.