(मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा संग्रहित फोटो)
मुंबई, 26 एप्रिल : तुमच्या जीवनात राजकीय अपेक्षा असेल, तुम्ही मुख्यमंत्री व्हावे, जर एका दिवसाचे मुख्यमंत्री झाला तर काय कराल? असा प्रश्नच अमृता फडणवीस यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना विचारला असता ‘राज्यात कायदे आहे. लॉ आहे पण ऑर्डर नाही. ऑर्डर दिली तर सगळं सुरळीत होईल. महाराष्ट्र पोलिसांच्या हातात 48 तास द्या, त्यांना सांगा महाराष्ट्र साफ करून द्या. सगळं काही साफ होईल’ असं खुमसदार उत्तर राज ठाकरेंनी दिलं. दैनिक लोकमतच्या महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2023 या कार्यक्रमात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि अमृता फडणवीस यांनी घेतली. यावेळी राज ठाकरेंनी आपल्या शैलीत उत्तरं दिली.
अमृता फडणवीस - तुमच्या जीवनात राजकीय अपेक्षा असेल, तुम्ही मुख्यमंत्री व्हावे, जर एका दिवसाचे मुख्यमंत्री झाला तर काय कराल? राज ठाकरे - काय जाईल, सूत कताई करेन. एका दिवसामध्ये काहीच होत नाही. एका दिवसाला काही अर्थ नसतो. तुम्ही आता पाच वर्ष देत होता. लगेच एका दिवसावर कुठे आलात. अमृता फडणवीस - जर सहा महिने दिले तर? राज ठाकरे - लगेच असं काही मी सांगू शकत नाही. एक दिवस, सहा महिन्यात असं काही होणार नाही. मी एक गोष्ट सांगतो, राज्यात कायदे आहे. लॉ आहे पण ऑर्डर नाही. ऑर्डर दिली तर सगळं सुरळीत होईल. महाराष्ट्र पोलिसांच्या हातात 48 तास द्या, त्यांना सांगा महाराष्ट्र साफ करून द्या. सगळं काही साफ होईल. सगळ्या गोष्टी त्यांना माहित असतात. रिस्क कोण घेईल, पोलिसांनी जर एखादी भूमिका घेतली तर कुणासाठी जेलमध्ये जाणार का? बसलेला माणूसच टेम्परेरी आहे, त्याच्यासाठी कोण जेलमध्ये जाणार. अमोल कोल्हे - प्रभावी विरोधक कोण जे सत्ताधाऱ्यांना घाम फोडू शकतात? राज ठाकरे - प्रभावी विरोध म्हटलं तर, अटलबिहारी वाजपेयी आणि अडवाणी हे होते. अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते. ते कवी मनाचे होते, अमृता फडणवीस - तुमची इमेज ही डॉन सारखी आहे, म्हणजे चांगला डॉन.. राज ठाकरे - म्हणजे, राज ठाकरे चांगला डॉन असतो. अमृता फडणवीस - जी डॉन इमेज आहे, तुम्हाला लोक घाबरतात का? राज ठाकरे- मला याचे उत्तर देता येणार नाही, काही गोष्ट तयार केली असेल तर त्या तात्पुरती असतात. मी काही डॉन वैगेरे नाही. मला परखडपणे बोलायला आवडतं, मी उद्धटपणे बोलत नाही, मला राग लवकर येतो. मावळतोही तितकाच. अमृता फडणवीस - एकनाथ शिंदे यांना काय सल्ला द्याल? राज ठाकरे - जपून राहा देवेंद्र फडणवीस राज ठाकरे - वरती संबंध नीट ठेवा अमृता फडणवीस - अजित पवार राज ठाकरे - खेडच्या सभेत मला सगळं बोलायचं आहे. बाहेर जेवढं लक्ष देत आहात, तेवढं काकांकडे लक्ष द्या. अमृता फडणवीस - उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे राज ठाकरे - त्यांना काय सल्ला देणार, स्वयंभू आहे ते. दोघेही सारखेच आहे. अमृता फडणवीस - फडणवीस यांनी वर लक्ष्य दिलं पाहिजे असं तुम्ही म्हणाला. त्यांनी थोड घरी पण लक्ष दिलं पाहिजे राज ठाकरे -मला तुमच्या घरच्या प्रश्नात नका आणू. मला तुम्ही मुलाखत घेणार हे कळलं, अमृता फडणवीस - राजकीय लोकांच्या घरी अशीच परिस्थिती असते, तुम्ही घरी वेळ देता का? राज ठाकरे - देवेंद्र फडणवीस हे सत्तेत आहे, उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर खूप जबाबदारी असते. ते घरी वेळ दिला नसेल, मला भेटले तर मी बोलेल त्यांना. आणि काही ठिकाणंही सुचवणार.