नवी दिल्ली, 8 मार्च : भारतीय रेल्वेने (Indian Railways) प्रवाशांना अधिक चांगली सुविधा देण्याच्या उद्देशाने अनेक इमरजेन्सी नंबर (Emergency number) बंद केले आहेत. आता यात सुविधा काय असं वाटू शकतं. परंतु भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठीच आता सर्व तक्रारी, सूचना आणि अडचणींसाठी केवळ एकच नंबर जारी केला आहे. जेणेकरुन अनेक नंबर लक्षात ठेवावे लागू नयेत. त्यामुळे आता कोणतीही समस्या, तक्रार असल्यास एकाच नंबरवर कॉल करावा लागेल. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आता कोणत्याही चौकशी, तक्रार, मदतीसाठी एकच हेल्पलाईन नंबर 139 हा असेल. प्रवाशांना अनेक नंबर लक्षात ठेवावे लागू नयेत तसंच एकच नंबर लक्षात ठेवणं सोपं आणि फायदेशीर ठरावं यासाठी रेल्वेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. जुने नंबर बंद - ट्विट करत रेल्वे मंत्रालयाने सांगितलं की, 139 नंबरवर सर्व सेवा मर्ज केल्यामुळे आता इतर सर्व नंबर बंद करण्यात आले आहेत. आधीचे 182 ,138 हे हेल्पलाईन नंबर होते, ते आता बंद करण्यात आले. नव्या 139 क्रमांकावर प्रवाशांना 12 भाषांमध्ये माहिती मिळू शकेल. 139 या हेल्पलाईन क्रमांकावर प्रवाशांना Passenger Name Record अर्थात पीएनआर, ट्रेनची स्थिती, SMS वरुन ट्रेनची माहिती, ट्रेनमधील सीटची उपलब्धता, तिकिट कॅन्सल करणं यासारख्या सर्व सुविधा या एका क्रमांकावर मिळू शकतील.
139 क्रमांकावर नऊ पर्याय असतील. 1 नंबर - दाबल्यानंतर सुरक्षा आणि इमरजेन्सीबाबत तक्रार 2 क्रमांकावर चौकशी - पीएनआर, भाडे, तिकिट बुकिंगसंबंधी माहिती 3 क्रमांक - कॅटरिंगसंबंधी तक्रारीसाठी 4 क्रमांक - सामन्य तक्रार 5 क्रमांकावर - सतर्कता आणि भ्रष्टाचारसंबंधी तक्रार 6 क्रमांकावर - ट्रेन दुर्घटनेसंबंधी तक्रार 9 क्रमांकाच्या - मदतीने आधी केलेल्या तक्रारीच्या स्थितीची माहिती घेता येईल. तसंच हॅश # दाबून कॉल सेंटर अधिकाऱ्याशी संपर्क साधता येईल.