मुंबई, 14 नोव्हेंबर : ‘हिंदुत्वाचा विजय झाला तर राज्य सरकारचा अहंकार गळून पडला. गेल्या चार महिन्यापासून मंदिरं उघडण्यासाठी जे आंदोलन आम्ही उभं केलं, या आंदोलनाला आणि आमच्या लढ्याला अखेर आज यश आलं. दिवाळीनंतर नियमावली तयार करू , त्यानंतर मंदिरं उघडू असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना दिवाळीतच पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरे उघडण्याची सदबुद्धी भगवंतानी दिली, हिंदुत्वाचा विजय झाला आणि ठाकरे सरकारचा अहंकार गळून पडाला,’ असं म्हणत भाजपच्या अध्यामिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे. ‘या लढ्यात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील सर्व साधुसंतांचे आणि भाविक जनतेचे आम्ही अभिनंदन करतो. या निर्णयाचं स्वागत करतो. गेल्या आठ महिन्यांपासून देव आणि भक्तांमध्ये जी दरी तयार झाली होती, ती या पाडव्याच्या मुहूर्तावर आता मिटणार आहे. भक्ताला भागवंताचं दर्शन घेता येणार आहे आणि ज्या लाखो कुटुंबाची उपजीविका या मंदिरावर अवलंबून होती, त्यांच्या घरात चूल सुध्दा पेटणार आहे. आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने पाडव्याला मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळांसमोर मोठ्या जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे,’ अशी माहिती तुषार भोसले यांनी दिली आहे. मंदिरे खुली करताना काय म्हणाले उद्धव ठाकरे? पाडव्यापासून राज्यातील मंदिरे उघडण्यास राज्य सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे. ‘हा फक्त सरकारी आदेश नसून ‘श्रीं ची इच्छा समजा! मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका. मंदिरे उघडतील, इतर प्रार्थनास्थळे उघडतील. आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला व महाराष्ट्राला मिळतील’, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.