मुंबई 13 जानेवारी : ‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून निर्माण झालेला वाद आता चिघळलाय. उत्तर प्रदेशातले भाजपचे नेते जयभगवान गोयल यांनी हे पुस्तक लिहिलंय. भाजपच्या दिल्लीतल्या मुख्यालयात हे पुस्तक प्रकाशित झाल्याने वादाची ठिणगी पडलीय. शिवसेनेसहीत सर्वच विरोधी पक्षांनी यावरून भाजपवर टीकेची झोड उठवलीय. या पुस्तकावर तातडीने बंदी घाला अशी मागणीही करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधी पक्षांच्या आरोपांना उत्तर दिलंय. जोपर्यंत ब्रम्हांड आहे तोपर्यंत शिवाजी महाराजांची कुणाशीही तुलना होऊच शकत नाही. नरेंद्र मोदी सुद्धा अशी तुलना करणार नाहीत. मात्र विरोधक राईचा पर्वत करत आहेत असा आरोपही त्यांनी केलाय. मुनगंटीवार म्हणाले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जाणता राजा असं विशेषण सर्रास वापरलं जातं. हे विशेषण शिवाजी महाराजांसाठी वापरलं जातं. असं असताना पवारांसाठी जेव्हा हे विशेषण वापरलं जातं तेव्हा विरोधकांना ते चालतं का असा सवाल त्यांनी केला. बांगलादेश युद्धानंतर इंदिरा गांधी यांनी दुर्गेची उपमा देण्यात आली होती, इंदिरा इज इंडिया आणि इंडिया इज इंदिरा असं म्हटलं गेलं होतं. याचा अर्थ इंदिरा गांधी या काही दुर्गेचा अवतार होत नाहीत. तर केवळ विशेषण म्हणून सांकेतिक अर्थाने त्याचा वापर केला जातो याचं तारतम्य विरोधकांनी हरवलं आहे असंही ते म्हणाले. विरोधकांनी भाजपवर एकच हल्लाबोल केला असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणे ही केवळ चमचेगिरी असल्याची घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली आहे. या प्रकरणात पंतप्रधानांना दोष देता येणार नाही. कारण कदाचित याबाबत त्यांना कल्पना नसावी, असेही राऊत यांनी यावेळी सांगितले आहे. ‘किती भाटगिरी करायची याला काही मर्यादा असतात’, छगन भुजबळ भडकले या वादग्रस्त पुस्तकाशी आपला संबंध नाही हे आज संध्याकाळपर्यंत भाजपने स्पष्ट करावे. पुस्तक मागे घेऊन आपली भूमिका स्पष्ट करावी, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. संजय राऊत म्हणाले, मी काहीही चुकीचे बोललो नाही. शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे दैवत आहेत. शिवाजी महाराजांबात वंशजांबाबतही प्रेम आहे. शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना कोल्हापूर, सातारा गादीवरच्या लोकांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. महाराजांची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही. याबाबत भाजपने हे पुस्तक मागे घेऊन आपली भूमिका स्पष्ट करावी. या पुस्तकाशी आमचा संबंध नाही, हेही भाजपने जाहीर करावे.
ज्याप्रमाणे दुसरे नरेंद्र मोदी होऊ शकत नाही, त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा झाल्याचेही राऊत यांनी सांगितली.