JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / VIDEO : मुलगा रेल्वेसमोर पडला आणि अंध आई चाचपडत राहिली, पण एक देवदूत धावला; काळजाचा ठोका चुकवणारी 27 सेकंद

VIDEO : मुलगा रेल्वेसमोर पडला आणि अंध आई चाचपडत राहिली, पण एक देवदूत धावला; काळजाचा ठोका चुकवणारी 27 सेकंद

मुंबईतील एक थरकाप उडवणारा व्हिडिओ (Mumbai Railway Station Video) समोर आला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 एप्रिल : एक्सप्रेस ट्रेनखाली येणाऱ्या एका लहान मुलाला वाचवतानाचा मुंबईतील एक थरकाप उडवणारा व्हिडिओ (Mumbai Railway Station Video) समोर आला आहे. वांगणी स्टेशनवर शनिवारी संध्याकाळी 5 वाजून 3 मिनिटांनी एक मुलगा आपल्या आईसोबत प्लॅटफॉर्मवर चालत होता. पण चालत असताना त्या लहानग्याचा तोल गेला आणि तो मुलगा ट्रॅकवर पडला. लहान मुलगा जेव्हा रेल्वेच्या ट्रकवर पडला नेमकं त्याच वेळेला एक मेल-एक्सप्रेस त्या मुलाच्या दिशेने येत होती. त्या मुलाची आई अंध होती, ती आपला मुलगा नेमका कुठे पडला हे चाचपडत होती. बिचारी कावरी बावरी झाली होती. तिला कळेना की नेमका तो कुठे पडला आणि तितक्यात उदयन एक्सप्रेस धडधड आवाज करत स्टेशनच्या दिशेने जोरदार वेगाने येत हाती. तो लहानगा अजून सावरला पण नव्हता आणि ट्रेनही जवळ येताना दिसली. तो मुलगा प्लॅटफॉर्मवर चढायचा प्रयत्न करत होता, पण प्लॅटफॉर्मची उंची जास्त असल्याने तो वर चढू शकत नव्हता. तितक्यात एक व्यक्ती जिवाच्या आकांताने त्या मुलाच्या दिशेने धावताना दिसली. तो व्यक्ती आपल्या जिवाची पर्वा न करता त्या मुलापर्यंत पोहोचला. पटकन त्याने मुलाला उचललं आणि प्लॅटफॉर्मवर फेकून दिलं आणि तो स्वतः विजेच्या गतीने प्लॅटफॉर्मवर चढला. तो व्यक्ती म्हणजे रेल्वेचा पॉइंटमन मयूर शेळके. मयूर कर्तव्यावर होता. त्याही परिस्थितीत त्याने आपल्या हातातील हिरवा झेंडा सोडला नाही.

संबंधित बातम्या

मयूर हा पॉईंटमन आहे. पॉईंटमन म्हणजे ट्रेनला पुढे जाण्यासाठी ट्रॅक सुरक्षित आहे म्हणून हिरवा झेंडा दाखवण्याचं काम असो की जिथे ट्रॅक एकमेकांत गुंतलेले असतात तिथे सगळं आलबेल आहे हे पाहण्याचं काम करतात. मयूर नसता तर त्या मातेने आपल्या मुलाला कायमचं गमावलं असतं. मोठा अपघात आणि दुर्दैवी घटना होण्यापासून मयूर शेळकेने वाचवलं. मयूर शेळकेच्या धैर्याला सलाम, अशी प्रतिक्रिाय आता उमटताना दिसत आहे. ‘मयूर हा खराखुरा हिरो आहे, मयूर नसता तर त्या मुलाला वाचवले कठीण झालं असतं. कदाचित मयूरचा स्वतःचा पण जीव गेला असता किंवा त्याला अपंगत्व आलं असतं. पण या सगळ्याची पर्वा न करता त्याने त्याला वाचवलं. रेल्वेतर्फे कामाची पोचपावती म्हणून नक्कीच त्याचा सन्मान करू. कारण मयूरचे काम हे दुसऱ्या इतरांसाठीही आदर्श घेण्यासारखा आहे. मयूर शेळके याच्या कामाचा आम्हाला अभिमान आहे की आपल्या कामाचा भाग नसतानाही अशा अनेकांना जीवदान देण्याचे काम रेल्वेचे कर्मचारी करतात,’ अशी प्रतिक्रिया मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या