JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / विधीमंडळ अधिवेशनात अचानक निर्माण झाला नवा ट्विस्ट

विधीमंडळ अधिवेशनात अचानक निर्माण झाला नवा ट्विस्ट

विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी नव्या प्रकरणाचा शोध घेत होते. विरोधी पक्षाला ही संधी अवघ्या काही तासातच मिळाली.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 6 मार्च : अधिवेशन आठवड्याच्या शेवटच्या दिवसाची (State Budget Session) शुक्रवारी तशी रटाळ सुरुवात झाली. सर्वांचं लक्ष राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालाकडे (Financial Survey Report) होतं. दुपारपर्यंत तो प्रसिद्धही झाला. पत्रकारांनी अहवालात डोकं खुपसलं, तर विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी नव्या प्रकरणाचा शोध घेत होते. विरोधी पक्षाला ही संधी अवघ्या काही तासातच मिळाली. 25 फेब्रवारीला दक्षिण मुंबईतील हाय प्रोफाइल समजल्या जाणाऱ्या पेडर रोड जवळील कारमायकल रोडवर एक संशयास्पद स्कॉर्पियो कार सापडली होती. या कारची तपासणी केल्यावर त्यात 25 जिलेटीनच्या कांड्या सापडल्या. या जिलेटीनच्या कांड्या स्फोटक नसल्या तरी त्या स्फोट घडवण्यासाठी महत्वाच्या भूमिका बजावतात. त्याचबरोबर या कारमध्ये एक धमकी पत्रही मिळालं होतं. प्रकरण अतिसंवेदनशील झालं. मुंबई पोलिसांबरोबर राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA चा तपास सुरू झाला. दुसऱ्याच दिवशी संशयास्पद स्कॉर्पियो कारचा मूळ मालक पोलिसांच्या समोर आला. मनसूख हिरेन त्याचं नाव. ठाण्याला घोडबंदर रोड जवळ राहणारे छोटे उद्योजक अशी त्यांची ओळख होती. मनसुख हिरेन स्वत: पोलिसांच्या समोर आले आणि त्यांनी त्यांची स्काँर्पियो कार आठवडाभरापूर्वीच चोरीला गेली असल्याचं सांगितलं. पोलिसांचा तपास सुरू होता. अधिवेशन आठवड्याच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली. मात्र अवघ्या काही तासातच बातमी येऊन धडकली की ठाण्यातील रेती बंदरजवळील खाडीत दलदलीत मनसुख हिरेन यांचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळला आहे. हेही वाचा - मुख्यमंत्र्यांसोबत होणार काँग्रेसचा संघर्ष? नाना पटोले यांनी केली नवी मागणी काही वेळापूर्वी विधान सभेत राज्यातील कायदा आणि सुव्यस्थेवर प्रदीर्घ चर्चा झाली होती. त्यानंतर लगेचच या हायप्रोफाईल केसमधील महत्वाच्या व्यक्तीचा संशयित मृत्यू झाल्याची बातमी आल्याने अधिवेशनातील वातावरण तापलं. विरोधी पक्ष नेत्यांचे आरोप… त्याला गृहमंत्र्यांची उत्तरं… तात्काळ मुंबई पोलीस आयुक्तांना विधान भवनात बोलावल्यामुळे वातावरण आणखीनच गंभीर बनले. सरकारची संजय राठोड प्रकरणातून सुटका होत नाही तोच आता मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूने अधिवेशनात नवा ट्विस्ट आला आहे. आता या प्रकरणातून सरकार स्वत: ची सुटका कशी करुन घेतय आणि विरोधक सरकारला कसे जेरीस आणतात हे आता नव्या आठवड्यातील पहिल्याच दिवशी स्पष्ट होईल, कारण पहिलाच दिवस अर्थ संकल्पाचा असणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या