नवी दिल्ली, 26 ऑगस्ट: सोशल मीडिया, इंटरनेटची क्रांती आणि स्टार्टअप्सना मिळणारं प्रोत्साहन यामुळे अलीकडच्या काळात उद्योग-व्यवसायांना गती मिळाली आहे. महिलांसाठी व्यवसायांच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. कोरोना महामारीनंतर घरबसल्या नोकरी किंवा व्यवसाय करण्याची अनेक दारं खुली झाली आहेत. विशेषतः महिलांना याचा खूप फायदा होतो आहे. घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळून नोकरी किंवा व्यवसाय करण्यासाठी घरातच राहून काम करणं महिलांसाठी (Work From Home Jobs For Women) गरजेचं असतं. त्यासाठी घरबसल्या (Earn From Home) उपलब्ध असणाऱ्या कामाचा फायदा होतो. घरात राहून कोणकोणत्या मार्गाने पैसे कमावता येऊ शकतात, याबाबत माहिती घेऊ या. ‘हरजिंदगी डॉट कॉम’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. जगभरात अनेक नागरिक घरात राहून काम करतात. इतकंच नाही, तर घरातून काम करून भरपूर पैसेही मिळवता येऊ शकतात. फ्रीलान्सर इन्कम अराउंड द वर्ल्ड 2018 या रिपोर्टनुसार, जगभरात 15 मिलियन नागरिक घरातून काम करून चांगले पैसेही कमावतात. सध्याची आकडेवारी कदाचित याहीपेक्षा जास्त असेल. स्त्रियाही या क्षेत्रात मागे नाहीत. तुम्हालाही घरून काम करून पैसे कमवायचे असतील, तर त्यासाठी काही पर्यायांचा विचार करता येईल. हेही वाचा - Syrma SGS IPOची दमदार लिस्टिंग, गुंतवणूकदारांना काही तासांत 35 टक्के नफा कंटेंट रायटर लेखनाची आवड व त्या संदर्भातलं ज्ञान असेल, तर घरात राहून कंटेंट रायटिंग (Content Writing) करता येऊ शकतं. अनेक वेबसाइट्ससाठी कंटेंट रायटिंग करता येतं. सोशल मीडियासाठीदेखील लिहिण्याचा पर्याय असतो. अनेक संस्थांसाठी सोशल मीडिया हँडलर (Social Media Handler) म्हणूनही काम करता येतं. अर्थात तुम्हाला उपलब्ध असलेल्या वेळेचं व पैशाचं गणित मांडून हवा तो पर्याय स्वीकारता येईल. ऑनलाइन टीचिंग शिक्षण घेताना वेळेची व श्रमांची बचत झाली, तर आनंदानं शिक्षण घेतलं जातं. त्यामुळेच सध्या ऑनलाइन शिक्षणाकडे (Online Teaching) कल वाढतो आहे. स्त्रियांसाठी हे क्षेत्र उत्तम आहे. घरात राहून तुम्ही ऑनलाइन टीचिंग करू शकता. काही क्लासेससाठी किंवा स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय करता येऊ शकतो. यू-ट्यूब यू-ट्यूबमुळे तत्काळ माहितीचं भांडार उपलब्ध झालं आहे. तुम्हीही व्हिडिओ करून यू-ट्यूबवर अपलोड करू शकता. त्याद्वारे पैसेही कमावता येतात. आजकाल अनेक मोठे ब्लॉगर घरबसल्या लाखो रुपये यू-ट्यूबच्या माध्यमातून कमावतात. डीआयवाय, रेसिपीज, क्राफ्ट, ब्युटी, गार्डनिंग किंवा कोणत्याही आवडीच्या क्षेत्राविषयी व्हिडिओ करता येऊ शकतो. त्यातून चांगले पैसे मिळू शकतात. ऑनलाइन बिझनेस तुम्ही एखादा बिझनेस सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाइन करू शकता. आर्टिफिशिअल ज्वेलरी किंवा कपड्यांचा व्यवसाय घरात बसून केवळ ऑनलाइन पद्धतीनं करता येऊ शकतो. या गोष्टी घरी तयार करून सोशल मीडियाद्वारे त्यांची विक्री करता येते. इतकंच नाही, तर रिटेलिंगचा व्यवसायही ऑनलाइन स्वरूपात करता येऊ शकतो. पैसे कमावण्यासाठी घराबाहेर पडावं लागण्याचा काळ आता सरला आहे. सध्याच्या काळात घरात राहून पैसे कमावण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.