JOIN US
मराठी बातम्या / मनी / ट्विटरमधील कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार! एलॉन मस्क संख्याबळ आणखी कमी करण्याच्या विचारात

ट्विटरमधील कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार! एलॉन मस्क संख्याबळ आणखी कमी करण्याच्या विचारात

ट्विटर कंपनीच्या एकूण कर्मचारी संख्येपैकी जवळपास अर्ध्या लोकांना कामावरून काढून टाकण्यात आलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर : गेल्या महिन्यापासून मायक्रोब्लॉगिंग सोशल मीडिया साईट ट्विटर सातत्यानं चर्चेत आहे. जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यापासून कंपनीमध्ये प्रचंड मोठे फेरबदल आणि गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. मस्क कंपनीचे सर्वेसर्वा झाल्यापासून अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. कंपनीच्या एकूण कर्मचारी संख्येपैकी जवळपास अर्ध्या लोकांना कामावरून काढून टाकण्यात आलं आहे तर, काहींनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. या प्रकरणाला आठवडा पूर्ण होण्याच्या आतच कंपनीतील शिल्लक कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर पुन्हा नोकरी गमावण्याची टांगती तलवार लटकू लागली आहे. ब्लूमबर्गनं दिलेल्या वृत्तानुसार, कंपनीचे मालक मस्क पुन्हा एकदा कर्मचारी कपात करण्याच्या विचारात आहेत. ‘एनडीटीव्ही’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. कंपनीचा कारभार हाती आल्यानंतर मस्क यांनी कर्मचाऱ्यांना विविध जबाबदाऱ्या दिल्या होत्या. कर्मचाऱ्यांनी ‘हार्डकोर वातावरणात’ काम करावं अथवा नोकरी सोडून जावी, असा अल्टिमेटमवर कर्मचाऱ्यांना मिळाला होता. याचा धसका घेऊन अनेकांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. त्या पूर्वी मस्क यांनी स्वत: काही कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं होतं. या सर्व गोष्टीचा कंपनीच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. तरीही मस्क आणखी लोकांना कामावरून काढून टाकण्याचा विचार करत आहेत. ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार, लवकरच याबाबत घोषणा केली जाईल. नवीन कर्मचारी कपातीमध्ये ट्विटरमधील सेल्स आणि पार्टनरशीप टीम्सच्या कर्मचाऱ्यांना टारगेट केलं जाईल, अशी शक्यता आहे. हेही वाचा -  तुम्हाला चुकीच्या पद्धतीनं नोकरीवरून काढलं तर नाही ना? वाचा, ही बातमी मस्क यांनी संबंधित विभागांच्या प्रमुखांना गरजेपेक्षा जास्त असलेल्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यास सांगितलं आहे. मात्र, मार्केटिंग आणि सेल्स डिपार्टमेंट हेड रॉबिन व्हीलर यांनी, असं करण्यास नकार दिला आहे. याशिवाय, पार्टनरशीप डिपार्टमेंट हेड मॅगी सनविक यांनीही रॉबिन व्हीलर यांचं अनुकरण केलं. परिणामी, दोघांचीही नोकरी गेली आहे, असं ब्लूमबर्ग आपल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे. टेस्ला आणि स्पेस एक्सचे सीईओ असलेल्या मस्क यांनी गेल्या महिन्यात 44 अब्ज डॉलर्स मोजून ट्विटर खरेदी केलं आहे. त्यानंतर मस्क यांनी ट्विटरच्या एकूण सात हजार 500 कर्मचार्‍यांपैकी 50 टक्के कर्मचारी काढून टाकले. शिवाय, कंपनीचं वर्क फ्रॉम-होम धोरणही रद्द केलं. जवळपास एक हजार 200 कर्मचाऱ्यांनी ‘हार्डकोअर वर्क’ पॉलिसीला कंटाळून राजीनामे दिले आहेत. ट्विटरमध्ये आमूलाग्र बदल केल्याबद्दल मस्क यांच्यावर तीव्र टीका होत आहे. मस्क यांनी ‘पेड ब्लू टिक सबस्क्रिप्शन’ लागू केलं होतं. मात्र, त्यामुळे मोठ्या प्रमाणात बनावट खाती सुरू झाली. परिणामी, हे सबस्क्रिप्शन लवकरच रद्द करावं लागलं. याशिवाय, ट्विटरनं आपला कम्युनिकेशन विभाग बरखास्त केला आहे. कारण, कंपनीच्या प्रेस लाइनवर पाठवलेल्या संदेशाला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या