रामेश्वर राव
नवी दिल्ली, 27 जुलै : मोठ्या गोष्टींची सुरुवात नेहमी छोट्या पावलापासून होत असते असं म्हटलं जातं. याची अनेक उदाहरणं आपल्याला केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात पाहायला मिळतात. त्यातलंच एक उदाहरण म्हणजे आज रिअल इस्टेट टायकून म्हणून ओळखले जाणारे जुपल्ली रामेश्वर राव. गरीब कुटुंबात जन्मलेल्या जुपल्ली रामेश्वर राव यांनी जिद्दीने शिकून होमिओपॅथीचं शिक्षण घेऊन डॉक्टरी पत्करली. नंतर आयुष्यात आलेल्या एका अनपेक्षित वळणावर ते चालू लागले आणि आज ते 11 हजार 400 कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. त्यांची यशोगाथा जाणून घेऊ या. ‘आज तक’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. 6 सप्टेंबर 1955 रोजी जुपल्ली रामेश्वर राव यांचा जन्म मेहबूबनगर जिल्ह्यात (तेव्हाचं आंध्र प्रदेश, आताचं तेलंगण राज्य) एका शेतकरी कुटुंबात झाला. कित्येक किलोमीटरची पायपीट करून त्यांनी शालेय शिक्षण घेतलं. कारण घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने वडील त्यांना सायकल घेऊ शकले नाहीत. अशा अनेक अडचणींशी दोन हात करत त्यांनी शाळेचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी त्यांनी हैदराबाद गाठलं. होमिओपॅथीची पदवी घेऊन ते डॉक्टर झाले आणि दवाखाना सुरू करून त्यांनी प्रॅक्टिसही सुरू केली. त्यातून त्यांची आर्थिक परिस्थिती थोडी सुधारली. Success Story: ना IIT ना IIM ची डिग्री, तरीही कोट्यवधींची सॅलरी; रोज 36 लाख कमावते ही व्यक्ती! इथपर्यंत त्यांचा रिअल इस्टेट क्षेत्राशी काही संबंध नव्हता. त्यांना त्यातलं काहीही माहिती नव्हतं. कॉलेजच्या दिवसांत ते विद्यार्थी नेते होते. त्यामुळे त्यांचा अनेकांशी संपर्क, ओळखी होत्या. त्याच दरम्यान त्यांनी 50 हजार रुपये खर्च करून एक प्लॉट विकत घेतला. 80च्या दशकात हैदराबादमध्ये शहरीकरण वाढू लागलं होतं. त्यामुळे शहरात लोकसंख्या वाढीला लागल्यामुळे घरं आणि प्लॉट्सना मागणी वाढली होती. रिअल इस्टेट उद्योग मूळ धरू लागला होता. त्याच काळात त्यांनी त्यांचा 50 हजार रुपयांचा प्लॉट तिप्पट किमतीत विकला. त्यानंतर त्यांना या क्षेत्रातल्या संधी लक्षात आल्या आणि त्यांनी डॉक्टरी सोडून याच व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. हेच त्यांच्या आयुष्यातलं निर्णायक वळण ठरलं. 1974 साली आपल्या तरुणपणी ते आपल्या मेहबूबनगरमधल्या गावातून हैदराबादमध्ये आले होते. अनेक चढ-उतार आणि वळणं त्यांच्या आयुष्यात आली; मात्र योग्य वेळी त्यांनी योग्य वळण घेतलं आणि आज एक रिअल इस्टेट टायकून बनले. 1981 साली जुपल्ली रामेश्वर राव यांनी माय होम कन्स्ट्रक्शन नावाने आपली पहिली कंपनी सुरू केली. मेहनतीची त्यांना सवय होतीच. त्यामुळे ते अधिकाधिक मेहनत करत गेले आणि पुढच्या काही दशकांत त्यांची गणना शहरातल्या श्रीमंत व्यक्तींमध्ये होऊ लागली. गृहनिर्माण सोसायट्या, व्यावसायिक वास्तू बांधण्यासह राव यांनी सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातही आपल्या व्यवसायाची व्याप्ती वाढवली. Success Story: कधीकाळी मुंबईच्या चाळीत राहायची ‘ही’ व्यक्ती, आज आहे भारतातील हाउसिंग फायनान्स क्षेत्राची जनक आजच्या घडीला पाहायला गेलं, तर त्यांची महासिमेंट ही कंपनी दक्षिण भारतातल्या आघाडीच्या कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीची वार्षिक उलाढाल 4 हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. आपले चार मुलगे आणि चार सुना यांच्या साह्याने राव हा अवाढव्य पसारा सांभाळतात. त्या वेळी तो प्लॉट घेण्याचा निर्णय घेतला नसता, तर आजही ते कदाचित हैदराबादच्या दिलसुखनगरमध्ये होमिओपॅथी क्लिनिक चालवताना दिसले असते. योग्य वेळी घेतलेल्या योग्य निर्णयाने आणि घेतलेल्या कष्टांमुळे त्यांच्या आयुष्याचं चित्रच बदलून गेलं. आज रिअल इस्टेट, सिमेंट, ऊर्जा अशा अनेक क्षेत्रांत त्यांच्या कंपनीचा विस्तार वाढला आहे.