मुंबई : शेअर मार्केटमध्ये आज सकारात्मक दिवस आहे असं म्हणायला हवं. गेल्या काही दिवसांपासून कोसळलेलं मार्केट आता मोठ्या अंकांनी वाढलं आहे. मंगळवारी ८०० अंकांनी शेअर मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळाली. मार्केट सुरूहोताच बाजारातील प्रमुख निर्देशकांना पंख मिळाले. सोमवारी अमेरिकी बाजारांमध्ये देशांतर्गत बाजाराला मजबूत पाठिंबा मिळाला. विदेशी निधीच्या खरेदीमुळे बाजारातील भावनाही सुधारली आहे. हॉटेल रेस्टॉरंट आणि मेटलच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. सकाळी 10:24 वाजता बीएसई सेन्सेक्स 783 अंकांच्या म्हणजेच 1.32 टक्क्यांच्या वाढीसह 59,924 वर होता. NSE चा NIFTY 50 देखील 236 अंकांनी म्हणजेच 1.34 टक्क्यांनी वाढून 17,857 वर पोहोचला. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 3 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
सोमवारी (19 सप्टेंबर) अमेरिकन बाजार तेजीने बंद झाले. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल अॅव्हरेज 197.26 अंकांनी किंवा 0.64 टक्क्यांनी वाढून 31,019.68 वर बंद झाला. S&P 500 देखील 26.56 अंकांनी किंवा 0.69 टक्क्यांनी वाढून 3,899.89 वर बंद झाला. Nasdaq Composite 0.76 टक्क्यांनी वाढून 11,535 अंकांवर पोहोचला. विदेशी फंड (FII) भारतीय बाजारात सातत्याने खरेदी करत आहेत. त्याचा फायदा देखील झाला. निफ्टीमध्ये दीड टक्क्यांनी तेजी पाहायला मिळत आहे. मीडियम टर्ममध्ये बाजारपेठेत तेजी पाहायला मिळू शकते असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.