नवी दिल्ली, 20 डिसेंबर : सोशल मीडियाचा वापर वाढल्यापासून आर्थिक घोटाळे व गैरव्यवहाराच्या घटना वाढल्या आहेत. व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून नागरिकांकडून पैसे मागितले जातात. अनेकदा सरकारच्या विविध योजनांसाठी नागरिकांकडून पैसे उकळले जातात. अशा प्रकारच्या फसवणुकीपासून साधव राहावं यासाठी सरकारकडून वेळोवेळी तशा सूचना नागरिकांना दिल्या जातात. आताही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून ट्विटरच्या माध्यमातून फसवणूक व गैरप्रकारांपासून सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आलाय. सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे न भरण्याबाबत त्यात सांगितलं आहे. ‘झी न्यूज हिंदी’नं त्याबाबत वृत्त दिलं आहे.
लोककल्याणाकरता सरकार अनेक योजना आणत असतं. स्वत:च्या व कुटुंबाच्या भविष्यासाठी लोकांनी आर्थिक तरतूद करावी, यासाठीही सरकार नागरिकांना प्रोत्साहन देतं. त्यासाठी काही योजनाही सुरु आहेत. त्यापैकीच एक आहे, ईपीएफ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना. केंद्र सरकारकडून नोकरदार व्यक्तींसाठी चालवण्यात येणाऱ्या या योजनेचा आधार घेऊन अनेकांनी आतापर्यंत नागरिकांना फसवलं आहे. म्हणूनच सरकारनं नागरिकांना सावधगिरीच्या सूचना दिल्या आहेत.
हे ही वाचा : मुलीचं भविष्य करा सुरक्षित, ‘या’ सरकारी स्कीममध्ये 250 रुपयांपासून करा गुंतवणूक
ईपीएफओच्या नावावर नागरिकांकडून फसवणुकीनं पैसे लाटल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळेच नागरिकांनी अशा व्यक्तींपासून सावध राहावं असं संघटनेनं म्हटलंय. चुकीच्या पद्धतीनं पैसे जमा करू नयेत, असंही संघटनेनं सांगितलंय. नागरिकांनी त्यांची खासगी माहिती, बँक खाते क्रमांक, पॅन क्रमांक, आधार क्रमांक व ओटीपी कोणालाही देऊ नये.
संघटना नागरिकांकडून फोन, सोशल मीडिया किंवा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अशी माहिती मागवत नाही. त्यामुळे नागरिकांनीही अशाप्रकारे कोणी माहिती मागत असेल, तर धोका लक्षात घ्यावा, असं संघटनेनं त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलंय. माहितीसोबतच पैसे भरण्यासाठीही सोशल मीडियाचा वापर करण्यास संघटना सांगत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय.
सरकारी योजनांच्या नावावर अनेक जण गैरव्यवहार करतात. नागरिकांना खोटी माहिती देऊन पैसे भरण्यासाठी तयार करतात. त्यामुळे नागरिकांचं आर्थिक नुकसान होतं. त्यामुळेच सरकारकडून नागरिकांसाठी सावधगिरीच्या सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. ईपीएफच्या नावाने फसवणुकीच्या घटना उघडकीस आल्यामुळे आता ईपीएफओकडून ट्विट करून बनावट मेसेज पाठवणाऱ्यांपासून दूर राहण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलंय.
हे ही वाचा : पर्सनल लोन घेणं फायद्याचं की तोट्याचं? समजून घ्या सोप्या शब्दात
सोशल मीडियामुळे माहिती काढणं सोपं झालं आहे. तसंच काही वेबसाईट्ससाठी किंवा अॅपसाठी व्यक्तिगत माहितीही भरून द्यावी लागते. अशा माहितीचा जर गैरवापर झाला, तर त्याआधारे लोकांना फसवता येऊ शकतं. त्याचाच फायदा असे फसवणारे लोक घेतात. म्हणून नागरिकांनी सोशल मीडियामार्फत पैशांचे व्यवहार करू नयेत, तसंच खासगी माहितीही कोणाला देऊ नये असं आवाहन ईपीएफओनं केलं आहे.