Income Tax Return Filing Deadline
नवी दिल्ली, 21 मे : भारत सरकारकडून इन्कम टॅक्स (Income Tax) भरणाऱ्यांना काहीसा दिलासा देण्यात आला आहे. Central board of Direct taxes (CBDT) कडून वित्तीय वर्ष 2020-21 साठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत दोन महिन्यांनी वाढवण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 30 सप्टेंबर पर्यंत मुदत वैयक्तिक कर भरणारे सर्वसामान्य नागरिक आता 30 सप्टेंबरपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकणार आहेत. CBDT कडून इन्कम टॅक्स कायदा 1961 च्या कलम 119 नुसार इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवून दिली आहे. या अगोदरही इन्कम टॅक्स विभागानं त्यांच्याशी संबंधित इतर कर भरण्यासाठी मुदत वाढ दिली होती. कंपन्यांसाठीही मुदतवाढ दिली CBDT कडून कंपन्यांना देखील इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढ दिली आहे. कंपन्या एक महिन्यानंतर इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकतात. सर्वसामान्य नागरिकांना दोन महिन्यांची मुदतवाढ दिली असून कंपन्यांना मात्र एक महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. आता कंपन्या 30 नोव्हेंबरपर्यंत गेल्या वर्षीचा इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकणार आहेत. सर्वसाधारणपणे नेहमी 31 ऑक्टोंबरला गेल्या वित्त वर्षातील इन्कम टॅक्स रिटर्न कंपन्यांना भरावा लागतो, यंदा 30 नोव्हेंबरपर्यंत भरता येऊ शकतो. फॉर्म 16 भरण्याची तारीख वाढवली CBDT कडून कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांचा फार्म 16 भरणं गरजेचे असते. आता हा फॉर्म भरण्यासाठी देखील एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. आता कोणतीही कंपनी 15 जुलैपर्यंत आपल्या कर्मचाऱ्यांचे फॉर्म 16 भरू शकणार आहे. हे वाचा - Corona दिलासा : मुंबई-पुण्यात कोरोनाचा उतरता आलेख कायम मुंबईत 1500 तर पुण्यात 1000 पेक्षा कमी रुग्णसंख्या, मृत्यूचं प्रमाणही घटलं टॅक्स ऑडिट रिपोर्ट भरण्यासाठीही मुदतवाढ टॅक्स ऑडिट रिपोर्ट आणि ट्रान्सफर प्राईसिंग सर्टिफिकेट भरण्यासाठी देखील एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. आता हा टॅक्स ऑडिट रिपोर्ट आणि सर्टिफिकेट 31 ऑक्टोंबरपर्यंत भरू शकता येणार आहे. Revised इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढ लेट रिवाईज इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदतही वाढवली असून शेवटची तारीख 31 जुलै 2022 ही असणार आहे. वित्तीय संस्थांसाठी फायनान्शिअल ट्रांजेक्शन स्टेटमेंट भरण्यासाठीचीही मुदत 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. अगोदर ही मुदत 31 मे अशी असायची.